मीरा भार्इंदरच्या महापौरांचे जातप्रमाण पत्र अडचणीत ? आज पुन्हा पडताळणी समिती समोर सुनावणी;
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 13:31 IST2018-02-05T13:31:03+5:302018-02-05T13:31:19+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेच्या भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांच्या जातप्रमाण पत्र पडताळणीची सुनावणी आज सोमवारी दुपारी ३ वा. मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समोर होणार आहे.

मीरा भार्इंदरच्या महापौरांचे जातप्रमाण पत्र अडचणीत ? आज पुन्हा पडताळणी समिती समोर सुनावणी;
- धीरज परब
मीरारोड - आमदाराच्या भावजय तथा मीरा भार्इंदर महापालिकेच्या भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांच्या जातप्रमाण पत्र पडताळणीची सुनावणी आज सोमवारी दुपारी ३ वा. मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समोर होणार असुन त्यांचे कुटुंब कामधंद्या निमीत्त मुंबईत येणे, वास्तव्याचा पुरावा प्रत्यक्षात दुकान असणे, प्रमाणपत्र मिळवताना मानीव दिनांका आधीचा जातीचा पुरावा नसणे आदी अन्य मुद्यां वरुन त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर गेल्या सुनावणीवेळी महापौरांचा पती विनोद व त्याच्या साथीदाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तक्रारदारास पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत डिंपल मेहता ह्या गोल्डन नेस्ट, रामदेव पार्क आदि भागातील प्रभाग १२ मधून खुल्या प्रवर्गातुन भाजपाच्या नगरसेविका म्हणुन निवडुन आल्या आहेत. डिंपल ह्या आमदार नरेंद्र मेहता यांचा लहान भाऊ विनोदच्या पत्नी आहेत. निवडणुकीत तब्बल ६१ जागा जिंकुन भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने आ. मेहतांनी आपली भावजय डिंपल यांना महापौर पदी बसवले.
यंदाचे महापौर पद इत्तर मागासवर्गिय महिले साठी राखीव असल्याने डिंपल यांनी दरजी या जातीचे जातप्रमाणपत्र निवडणुकी आधी युध्द पातळीवर मिळवले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना मात्र आपली जात नमुद केली नव्हती.
दरम्यान महापौरांचे जातपत्रमाण पत्र मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समिती कडे असुन त्यांचे जातप्रमाणपत्र खोट्या पुराव्यां आधारे दिले गेल्याची तक्रार जिद्दी मराठा संस्थेचे प्रदिप जंगम यांनी केली आहे. तर माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी माहिती अधिकारात या बाबतची कागपदत्रं काढली होती.
समितीच्या माटुंगा लेबर कॅम्प येथील कार्यालयात १ फेबु्रवारी रोजी झालेल्या सुनावणी वेळी माहापौरांचे वकिल मेदाडकर यांच्या वतीने म्हणणं सादर करताना जंगम यांच्यावरच ते ब्लॅकमेलर असल्याचा आरोप करण्यात आला होता. सुनावणी झाल्यावर कार्यालयाच्या आवारातच महापौरांचे पती विनोद व त्यांचा साथीदार नितिन पांडे याने जंगम यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी जंगम यांनी महापौरांचे पती विनोद सह पांडे विरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आजच्या सुनावणी साठी पोलीस जंगम यांना संरक्षण देणार आहेत.
तक्रारदार जंगम व त्यांची बाजु मांडणारे सुवर्णा यांनी दिलेल्या माहिती नुसार, महापौरांनी आपलं जातप्रमाण पत्र मिळवताना सादर अर्जा मध्ये गुजरात मधुन महाराष्ट्रात स्थलांतराचे वर्ष आणि कारण नमुद केलेले नाही. आत्या मंजुला गोहिल यांचा शाळेचा दाखला जोडला असुन त्या मध्ये शाळा प्रवेश हा ४ जुलै १९६९ रोजीची नोंद आहे. वास्तविक जातीच्या प्रमाणपत्रासाठी १३ आॅक्टोबर १९६७ या मानीव दिनांका आधीचा पुरवा लागतो.
रहिवासाचा पुरावा जोडताना जी - ६, इराणी चाळ, काळाचौकी येथील मतदार यादीतील नोंदीचा १९६७ पुर्वीचा पुरावा जोडला आहे. पण सदर ठिकाण सदनिका नसुन दुकान असल्याने ते निवासाचा पुरावा धरता येत नाही.
महापौरांचे वडिल मोहनलाल यांनी त्यांचे आजोबा करसनभाई हे १९३० पुर्वी कामधंद्या निमीत्त मुंबईत आले असे जबाबात नमुद केले आहे. तसेच वडिल त्रिकमदास यांचा जन्म मुंबईत झाल्याचे म्हटले आहे. परंतु माहिती अधिकारात त्रिकमदास यांचा जन्म मीठापुर, गुजरात येथे झाल्याचे आढळले असुन शासन आदेश तसेच २०१२च्या विनीयमा नुसार नोकरी, सेवा, शिक्षण, कारावास या करीता असलेलं वास्तव्य हे कायम रहिवास म्हणुन मोडत नाही. या शिवाय अन्य मुद्दे देखील तक्रारदारांनी उपस्थित केले आहेत.
त्यामुळे आजच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागले असुन तक्रार जंगम यांच्या वतीने सुवर्णा हे बाजु मांडणार आहेत. सत्तेच्या दबावा खाली आधी जातीचा योग्य पुरावा नसताना जातप्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.