Meera Bhayandar becomes a municipality on contractor; Drivers continue to loot | कंत्राटदारावर मीरा-भाईंदर पालिका झाली मेहेरबान; वाहनचालकांची सुरू आहे लूट

कंत्राटदारावर मीरा-भाईंदर पालिका झाली मेहेरबान; वाहनचालकांची सुरू आहे लूट

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस स्कायवॉकखाली रस्ता व पदपथावर महापालिकेने दुचाकी पार्किंगसाठी दिलेल्या कंत्राटातील अटींचे उल्लंघन होत असताना दुसरीकडे महापालिका मात्र कागदी घोडे नाचवत कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे. कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी उलट पालिकेने मुदतवाढ दिली आहे.

 भाईंदर पश्चिमेस रेल्वेस्थानकाजवळ स्कायवॉकखाली दुचाकी वाहनतळासाठी महापालिकेने १५ जून २०१६ रोजी ए-वन केअरटेकर या कंत्राटदारास तीन वर्षांकरिता कंत्राट दिले. कंत्राटदाराने एकूण १२ लाख ९० हजारांची रक्कम पालिकेला दिली होती. १०६ दुचाकी ठेवण्याची क्षमता ठरवून कंत्राट दिले.

मात्र, आज कंत्राटदार ३०० च्या आसपास दुचाकी उभ्या करत आहेत. सहा तासांसाठी पाच रुपये, १२ तासांकरिता आठ रुपये व २४ तासांसाठी १२ रुपये असे दर निश्चित केले होते. मात्र, कंत्राटदार सरसकट १५ रुपये आकारत आहे. कंत्राटाची मुदत १४ जून २०१९ रोजी संपलेली असून त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त दीपक पुजारी यांनी पुढील कंत्राट मंजूर होईपर्यंत कंत्राटदारास मुदतवाढ दिली होती.

दरम्यान, प्रवीण परमार यांनी छायाचित्रांसह कंत्राटदार करारनाम्याचे उल्लंघन करत असल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. दरफलक लावलेले नाहीत. पावती प्रमाणित केलेली नाही. त्यावर वाहन येण्याची व जाण्याची वेळ टाकली जात नाही आदी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पुजारी यांनी संबंधित कंत्राटदार, तक्रारदार यांची सुनावणी घेऊन अटींचे पालन करण्यास सांगितले होते. परंतु, कार्यवाही मात्र पुजारी यांनी केली नाही. नागरिकांकडून शुल्कवसुली करत असतानाही वाहनांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मात्र पालिका, कंत्राटदार घेण्यास तयार नाही. नगरसेवकही याकडे डोळेझाक करत आहेत.

नव्या कंत्राटदाराचा शोध सुरू

कंत्राटदार अटींचा भंग करतोय. पालिकेने नोटीस बजावूनही कारवाई केलेली नाही. उलट, पाठीशी घालणे सुरू आहे, असे परमार यांनी सांगितले. कंत्राटदारास नोटीस बजावली असून नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे, विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे यांनी सांगितले.

Web Title: Meera Bhayandar becomes a municipality on contractor; Drivers continue to loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.