कल्याणमध्ये लवकरच होणार फुटबॉलचे मैदान, महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:04 IST2017-09-15T16:02:16+5:302017-09-15T16:04:04+5:30
फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणारे फुटबॉलचे मैदान लवकरच तयार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

कल्याणमध्ये लवकरच होणार फुटबॉलचे मैदान, महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिली माहिती
कल्याण, दि. 15 - फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणारे फुटबॉलचे मैदान लवकरच तयार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला बिर्ला कॉलेजच्या मैदानावर कल्याणात सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जगप्रसिद्ध असणाऱ्या फिफा स्पर्धांचे काही सामने भारतात व्हावेत या उद्देशाने आज संपूर्ण देशात अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. हे सामने भारतात व्हावे म्हणून युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे आधीपासूनच पाठपुरावा करीत असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने देशभरात ही स्पर्धा होत असून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचेही महापौर म्हणाले.
ज्याच्याकडे खिलाडू वृत्ती असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच मागे राहत नाही. या खिलाडू वृत्तीमूळेच अपयश येऊनही परत उठून उभे राहण्याची उर्मी मिळत असल्याचे मत ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले. या स्पर्धेतून एका खेळाडूची जरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तर या स्पर्धेचे चीज होईल असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेश चंद्र, नगरसेवक दशरथ घाडीगांवकर, शिवसेना पदाधिकारी संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.