भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग; १२ गोदाम जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
By नितीन पंडित | Updated: June 14, 2025 19:12 IST2025-06-14T19:12:02+5:302025-06-14T19:12:26+5:30
घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या.

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग; १२ गोदाम जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
नितीन पंडित
भिवंडी: अंजुर फाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत सायंकाळी केमिकल साठवलेला गोदामात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत एकूण बारा गोदाम जळून खाक झाले असून अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदामा संकुलातील आठ गोदामात मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सुरुवातीला आग लागली. गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्या ने वाढत गेल्याने पाहता पाहता आगीच्या भक्षस्थानी १२ गोदाम जळून खाक झाली आहेत. गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल असल्याने या संपूर्ण परिसरात उग्र वास व धूर पसरत राहिल्याने नागरिकांना डोळे चूरचूरणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.
घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या. अंजूरफाटा ते दापोडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचण निर्माण होत होती. नारपोली पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी येथील गर्दी नियंत्रणात आणली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पण ही आग आटोक्यात येण्यास अजून किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही अशी माहिती अग्निशामक जवान विजय जाधव यांनी दिली आहे.