लग्नाच्या अमिषाने अपहरण, अवघ्या 15 दिवसात छडा : मुलीची मध्यप्रदेशातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 22:04 IST2017-10-01T22:03:40+5:302017-10-01T22:04:10+5:30
लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

लग्नाच्या अमिषाने अपहरण, अवघ्या 15 दिवसात छडा : मुलीची मध्यप्रदेशातून सुटका
जितेंद्र कालेकर
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याच्या तावडीतून या मुलीचीही सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याच्या सावरकरनगर भागात राहणारी ही १७ वर्षीय मुलगी १६ सप्टेंबर २०१७ पासून अचानक बेपत्ता झाली. जाण्यापूर्वी तिने मैत्रिणीच्या घरी कोणी नसल्याने आपण तिच्याकडे जात असल्याचे कारण सांगितले होते. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गेलेल्या या मुलीची दुसºया दिवशी कुटूंबियांनी वाट पाहिली. ती न आल्यामुळे तिची सर्वत्र शोधाशोध केली. कुठेही न आढळल्यामुळे अखेर तिच्या पालकांनी १७ सप्टेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन आंब्रे यांच्या पथकाने तिचा शोध सुरु केला. चौकशीत तिच्याच एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून तिला सावरकरनगर भागात राहणाºया सिसोदिया (मुळ रा. कंचनपूर, ता. चंदला, जिल्हा छत्रपूर, मध्यप्रदेश) याने पळवून नेल्याची माहिती समोर आली. यातून तांत्रिक तपासाच्या आधारे, खबºयांच्या मदतीने तसेच मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या आदेशाने जमादार आर. के. दाभाडे यांचे पथक मध्यप्रदेशात पाठविण्यात आले. या पथकाने सिसोदियाची धरपकड केली असून त्याच्या तावडीतून पिडीत मुलीची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोमवारी ठाण्यात आणणार
शनिवारी विजयादशमीच्या दिवशी वर्तकनगर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात गेल्यानंतर त्यांनी चंदला पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार यादव यांची या अपहरणाचा तपास करण्यासाठी मदत घेतली. दसºयाच्या दिवशी या भागात मोठी गर्दी असते, त्यामुळे कारवाईला पोषक वातावरण नसते, असे यादव यांनी सांगितले. रविवारी मात्र, सिसोदियाच्या घरी धाड टाकून पोलिसांनी त्याला पकडले. ही मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिच्याशी लग्न केल्याचा दावा केला आहे. आता या सर्वच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला सोमवारी ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली.