भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

By नितीन पंडित | Updated: November 1, 2023 16:11 IST2023-11-01T16:09:43+5:302023-11-01T16:11:09+5:30

मानकोली अंजुर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या अवजड वाहनांकडून टोल कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसूल करत आहे.

Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi; Angry activists of NCP broke the Malodi toll booth | भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या मानकोली अंजुर फाटा चिंचोटी रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने व आंदोलने करूनही या महामार्गावर शासकीय शासकीय यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या मार्गावरील मालोडी येथील टोलनाका फोडला आहे.

मानकोली अंजुर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या अवजड वाहनांकडून टोल कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसूल करत आहे. मात्र चिंचोटी पासून मानकोली पर्यंतच्या २६ किलोमीटर रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे तसेच धुळ व खडी रस्त्यावर पसरल्याने येथे दररोज अपघात होत आहेत. 

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत तसेच काही महिन्यांपूर्वी टोल नाक्यासमोर उपोषण आंदोलन देखील केले होते. मात्र या आंदोलनांचा व निवेदनांचा काहीही परिणाम होत नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी प्रशांत म्हात्रे यांनी बुधवारी दुपारी मालोडी टोलनाका फोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व टोल वसूल करणाऱ्या कंपनीचा निषेध केला आहे.

टोल नाका फोडण्यापूर्वी आंदोलकांनी व्हिडिओ बनवून या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपल्या मागण्यांची दखल शासन घेत नसल्याने अखेर कायदा हातात घेऊन टोल नाका फोडत असल्याचे महेंद्र पाटील व प्रशांत म्हात्रे यांनी सांगून टोल नाका फोडला आहे, सध्या हा व्हिडिओ देखील माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title: Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi; Angry activists of NCP broke the Malodi toll booth