ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्यास अटक, राजस्थानी तस्कराकडून ४८ लाखांचा माल जप्त
By जितेंद्र कालेकर | Updated: April 25, 2025 21:29 IST2025-04-25T21:29:13+5:302025-04-25T21:29:24+5:30
ठाणे शहर परिसरात बाहेरील राज्यातील ड्रग्ज तस्कारांकडून अंमली पदार्थ विक्री होत असल्याने त्यांच्याविरूध्द कारवाईचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी दिले.

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्यास अटक, राजस्थानी तस्कराकडून ४८ लाखांचा माल जप्त
ठाणे: मेफेड्रीन (एमडी) पावडर या अमली पदार्थाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या घेवाराम पटेल (२१) या राजस्थानी तरुणाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ
विराेधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २४२.०९ ग्रॅम वजनाचा ४८ लाख ४१ हजार ८०० रुपयांचे एमडी हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.
ठाणे शहर परिसरात बाहेरील राज्यातील ड्रग्ज तस्कारांकडून अंमली पदार्थ विक्री होत असल्याने त्यांच्याविरूध्द कारवाईचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी दिले. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी अशा कारवाईच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या हाेत्या. याचदरम्यान ठाण्यातील गायमुख येथे काही जण एमडी पावडरच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अजय सपकाळ यांना मिळाली.
१६ एप्रिल २०२५ राेजी ठाण्यातील घाेडबंदर राेड भागातील गायमुखजवळ एमडी तस्करीसाठी आलेल्या घेवाराम याला पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पाेलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राहुल मस्के आणि सहायक पाेलीस निरीक्षक निलेश माेरे यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे शहर परिसरात ड्रग्ज तस्करीचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक राजेंद्र निकम हे अधिक तपास करीत आहेत.