‘माझ्या भ्रष्टाचाराचा व्हिडीओ लागलीच व्हायरल करा...!’; मंत्री गणेश नाईक यांनी दिले खा. म्हस्के यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:25 IST2025-10-07T09:24:51+5:302025-10-07T09:25:01+5:30
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात पत्रकारांशी ते बोलत होते. दोन दिवसापूर्वी खा. म्हस्के यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित करू, असा इशारा दिला होता. त्यावर नाईक यांनी आपली आव्हानात्मक भूमिका स्पष्ट केली.

‘माझ्या भ्रष्टाचाराचा व्हिडीओ लागलीच व्हायरल करा...!’; मंत्री गणेश नाईक यांनी दिले खा. म्हस्के यांना आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मी गेली ३५ वर्षे आमदार असून, या काळात मला इशारे देणारे अनेक लोक आले आणि गेले, त्यांची नावेही मला आठवत नाहीत. आजही मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्या गरजांइतके पैसे माझ्याकडे आहेत. मी अशी कोणतीही कामे करत नाही, ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल. त्यामुळे माझा व्हिडीओ व्हायरल करायचा असेल तर लागलीच करा, कशालाही सामोरे जाण्यास तयार असल्याचे आव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांना सोमवारी दिले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात पत्रकारांशी ते बोलत होते. दोन दिवसापूर्वी खा. म्हस्के यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित करू, असा इशारा दिला होता. त्यावर नाईक यांनी आपली आव्हानात्मक भूमिका स्पष्ट केली.
ठाण्यातील लाचखोरीबाबत नाराजी
अलीकडे उघड झालेल्या ठाणे मनपा उपायुक्तांच्या लाचखोरीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायाधीशांच्या घरातही पैसे सापडतात, मग न्याय मागायचा कोणाकडे? हे लोकांचे दुर्दैव आहे. जर गणेश नाईक भ्रष्टाचारी असेल, तर माझी प्रकरणे बाहेर काढा. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही.
जो आपले कर्तव्य पार पाडत नाही तो नालायक असतो. मी काम करत नसेन तर मीसुद्धा नालायकच ठरू शकतो, असेही ते म्हणाले. प्रशासनात दहा टक्के लोक नालायक आहेत, याची प्रचिती अलीकडेच आली. प्रशासनापेक्षा राजकारणी अधिक नालायक आहेत, असे ते म्हणाले.
दरबारातून लोकांना दिलासा
जनता दरबार बंद करण्याच्या चर्चेला उत्तर देताना नाईक म्हणाले, माझ्याकडे दरबार भरविण्याची हौस नाही, लोकांना दिलासा देण्याचे काम या दरबारातून होते. जर येथे कोणी येणारच नसेल तर दरबार बंद करायला मी अजिबात वेळ लागणार नाही.
विमानतळाला ‘दि.बां.’चे नाव
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत नाईक म्हणाले की, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, असा मला विश्वास वाटतो. या संदर्भात दोन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे.