Vidhan Sabha 2019: मंत्र्याचा पीए भाजप, शिवसेनेतून लढण्यास इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:40 IST2019-09-21T23:33:39+5:302019-09-22T06:40:02+5:30
दोन्ही ठिकाणी दिल्या मुलाखती; नगरसेवक संदीप भराडे यांनीही लावली फिल्डिंग

Vidhan Sabha 2019: मंत्र्याचा पीए भाजप, शिवसेनेतून लढण्यास इच्छुक
- पंकज पाटील
अंबरनाथ : गेल्या गणेशोत्सवाच्या काळात शहरभर बॅनरबाजी करून एक नाव पुढे आले. नेमकी ही व्यक्ती कोण, याचा शोधही सुरू झाला. अखेर, हे नवीन नाव भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत दिसल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या. केवळ इच्छुक म्हणून नव्हे तर भाजपने घेतलेल्या मुलाखतीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, या मुलाखतीनंतर उमेदवारी घोषित होण्याची वाट न पाहता त्यांनी शिवसेनेकडूनही इच्छुक म्हणून नाव दाखल केले. त्यासाठी शिवसेनेचे सदस्यत्व घेत त्यांनी मुलाखत दिली. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीचा दावा करणारा उमेदवार हा एका मंत्र्याचा पीए असल्याचे उघड झाले आहे. सरकारी नोकरीचा त्याग करून राजकीय वाट शोधण्यासाठी ते कल्याणहून अंबरनाथला आले आहेत. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीचा दावा करणाऱ्या या व्यक्तीची सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असल्याने या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांची रांग लागली आहे. राखीव मतदारसंघामुळे अंबरनाथमधील दिग्गज राजकारण्यांना हवशा-नवशांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असतानाही आमदारकीच्या निवडणुकीत नशीब आजमावण्याची संधी अंबरनाथमधील बड्या नेत्यांना मिळालेली नाही. त्यामुळे मर्जीतल्या एखाद्या उमेदवाराला पुढे करून आपली ताकद आजमावण्याचे काम अंबरनाथमध्ये सुरू
आहे. शिवसेनेकडून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात असताना नवख्या उमेदवारांना पुढे करत शहरातील चित्र बिघडवले जात आहे. अंबरनाथच्या उमेदवारीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या हातात आहे. मात्र, पक्षातील इतर इच्छुकांचाही विचार व्हावा, या हेतूने मोर्चेबांधणी केली जात आहे.
इच्छुकांच्या मुलाखतीबाबत अनभिज्ञ
शिवसेनेच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती शिवसेना भवनात झाल्याची चर्चा होती. या मुलाखतीसाठी अंबरनाथमधून नगरसेवक भराडे यांनी मुलाखत दिली आहे. दुसरे इच्छुक म्हणून सुबोध भारत यांनी उमेदवारी दिली आहे. शिवसेनेतून इतर इच्छुक उमेदवारांपैकी उत्तम आयवळे आणि माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे हे मुलाखतीपासून वंचित राहिले आहेत. इच्छुकांच्या मुलाखती नावापुरत्या असल्याची चर्चा होत आहे.
मंत्र्याचा पीए इच्छुकांच्या रांगेत
पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पीए म्हणून काम करणारे भारत यांनी याआधी सहा मंत्र्यांकडे पीए म्हणून काम केले आहे. अंबरनाथमध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी आपली शासकीय नोकरी सोडून इच्छुकांच्या रांगेत उभे राहणे पसंत केले आहे. मात्र, त्यांना याचे किती फळ मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे.
प्रथम आपण भाजपमधून इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे. आता शिवसेनेचे सदस्यत्व घेऊन शिवसेनेतूनही मुलाखत दिली आहे. अंबरनाथमध्ये उमेदवारीसाठी आपण युतीच्या माध्यमातून इच्छुक असल्याने दोन्ही पक्षांत मुलाखत दिलेली आहे. आपल्याला संधी मिळाल्यास आपण विकासाचे चित्र निर्माण करू.
- सुबोध भारत, इच्छुक उमेदवार
इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवार मागण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पक्ष त्यासंदर्भात काय निर्णय घेईल, हे सांगता येत नाही. आपण केलेल्या कामांचा आढावा पक्षाकडे आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेचा विचार करून आपल्याला कोणताही धोका नाही. पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल. आजही आम्ही काम करणारे कार्यकर्तेच आहोत. - डॉ. बालाजी किणीकर, आमदार