Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:33 AM2019-09-26T00:33:43+5:302019-09-26T00:34:00+5:30

कल्याण पश्चिमेवर सेनेचा दावा; इच्छुक भेटले पालकमंत्र्यांना

Maharashtra Vidhan Sabha 2019 Equitable allocation of seats for Kalyan-Dombivali alliance | Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

Next

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला घेण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार हे विद्यमान आमदार आहेत. वास्तविक, हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघात शिवसेनेचे १८ नगरसेवक आहेत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला पाहिजे, या मागणीसाठी कल्याण पश्चिमेतून इच्छुक असलेले शिवसेनेचे प्रकाश पेणकर, विश्वनाथ भोईर, रवी पाटील, अरविंद मोरे, सचिन बासरे, श्रेयस समेळ, मयूर पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी कल्याण पूर्व, डोंबिवली हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्यास शिवसेनेचे प्राबल्य असलेले उर्वरित दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले पाहिजेत, अशी मागणी इच्छुकांच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा निर्विवाद दावा आहे. कल्याण पूर्वेत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपला समर्थन दिल्याने भाजपकडून ते दावेदार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेची जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा पूर्वापार भाजपच्याच वाट्याला आहे. कल्याण पश्चिमची जागा भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्यामुळे भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या सर्व मुद्यांवर चर्चा सुरू आहे. कल्याण पश्चिमेवर आपण दावा केल्याचेही त्यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीतील विधानसभेच्या चार जागांपैकी तीन जागा भाजपकडे जाणार असतील आणि शिवसेनेच्या वाट्याला केवळ एकच जागा येत असेल, तर तो असमतोल असल्याचे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे चारपैकी दोन जागा शिवसेनेला व दोन जागा भाजपला देण्याची आणि कल्याण पश्चिमेची जागा भाजपला देण्याऐवजी शिवसेनेने स्वत:कडे ठेवावी, असा आग्रह या इच्छुकांनी केला आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यावेळी भाजपने बंडखोरी केल्याने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मनसेचे प्रकाश भोईर निवडून आले होते. २०१४ साली शिवसेना-भाजप युती नव्हती. त्यामुळे मोदीलाटेत पवार निवडून आले. आता युती होण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेने कल्याण पश्चिमेवर दावा ठोकला आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Equitable allocation of seats for Kalyan-Dombivali alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.