Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:52 AM2019-10-23T01:52:09+5:302019-10-23T06:21:55+5:30

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

Maharashtra Election 2019: Fear of Result in Candidates | Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती आहे. निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात यंदा ४१.७४ मतदान झाले. २०१४ मध्ये येथे ४४.९२ टक्के मतदान झाले होते. ते पाहता येथे ३.१८ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत येथे मतदारांची संख्याही वाढली. मात्र, सोमवारी मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाचा टक्का वाढला नसल्याचे पाहायला मिळते.

मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेने जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. मात्र, तिला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच जागृतीची मोहीम अनेक मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याने मतदार बाहेर पडला नाही, असे कारण सांगितले जात आहे.

कल्याण पश्चिमेत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड, वाहतूककोंडी, पत्रीपूल या प्रमुख समस्या होत्या. या समस्या सुटाव्यात, यासाठी मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मतपेटीतून राग व्यक्त करतील, असा दावा केला जात होता. मात्र, मतदार बाहेर पडले नाहीत. मतपेटीतून त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले नाही, ही बाब मतदानाची आकडेवारीच उघडपणे सांगत आहे.

त्याचबरोबर जनमानसात अशीही चर्चा निवडणुकीपूर्वी नेहमीच ऐकू येते ती म्हणजे मतदान कोणालाही करा, कोणीही निवडून येईल. तरी देखील समस्या तशाच राहील, त्यात काही फरक पडणार नाही. शहराच्या विकासात निवडणुकीमुळे कोणताच फरक पडत नाही, अशी एक प्रकारची हतबलताही मतदारांमध्ये घर करू लागली आहे. त्यामुळेच मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था आहे, हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मतदानाची २१ आॅक्टोबर ही तारीख रविवारच्या सुटीला जोडून आली. त्यामुळे अनेकांनी शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस अथवा सोमवारच्या सुटीचा फायदा घेत शहराबाहेर जाणे पसंत केले.

मी मतदान न करण्याने इतका मोठा फरक पडणार नाही, अशीही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात उपनगरात वाढीस लागली आहे. तिचाही मोठा फटका मतदानाला बसला आहे. घटलेल्या मतदानाबरोबरच ‘नोटा’चे बटण दाबणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असण्याची शक्यता आहे.
बहिष्कार नसतानाही झाले कमी मतदान

कल्याण ग्रामीण मतदारसंघातही रस्ते, वाहतूककोंडी, नागरी सुविधा, पाणी तसेच २७ गावांचा प्रश्न, अशा अनेक समस्या आहेत. २७ गावांतील मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, येथे मतांच्या टक्केवारीत एक टक्का घट झाली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात २०१४ मध्ये ४७.९४ टक्के मतदान झाले होते. तर, यंदा येथे ४६.३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा मतदानावर कोणाचाही बहिष्कारही नव्हता, तरी देखील मतदान एक टक्क्याने घटले. त्यामुळे येथील मतदारालाही मतदारसंघात बदल घडविण्यासाठी बाहेर पडावेसे वाटले नाही.

Web Title: Maharashtra Election 2019: Fear of Result in Candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.