Lockdown News: गावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून सुरू आहे उदरनिर्वाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:49 IST2020-05-08T01:49:27+5:302020-05-08T01:49:38+5:30
लॉकडाउनचा परिणाम : कधी काळी त्यांनाच करायचे मदत

Lockdown News: गावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून सुरू आहे उदरनिर्वाह
कुमार बडदे
मुंब्रा : अन्नासाठी सुरु असलेल्या संघर्षामुळे कुटुंबीयांचे होत असलेले केविलवाणे चेहरे बघून कासावीस झालेल्या अनेक कुटुंबप्रमुखांनी मूळगावी असलेल्या त्यांच्या वृद्ध पालकांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. आधी हिच मंडळी त्यांना नियमित पैसे पाठवयाची.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही सामाजिक संस्थांनी तांदूळ, दाळ, तेल, मीठ अशा काही जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. परंतु जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला, तसतसा मदतीचा ओघही आटत गेला. एप्रिल महिन्यामध्ये पंधरा दिवस बहुतांश कुटुंबांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत:च क्वारंटाईन झाल्यानंतर काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तीही मदत संपुष्टात आली. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात वाहतूक सेवा ठप्प होती. त्यामुळे मूळगावी जाणेही शक्य नव्हते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खिशात पैसे नाही, सामाजिक संघटनांकडून मिळणारी मदतही बंद झाली, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची उपासमार बघून अनेकांनी मूळगावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून बँकिंग सेवेच्या माध्यमातून पैसे मागवून उदरनिर्वाह सुरु केल्याची माहिती मूळगावी असलेल्या नातेवाईकांकडून आठ हजार रुपये मागवलेल्या लालबाबू कुमार गुप्ता या नाका कामगाराने ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ४५ दिवसांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कामकाज ठप्प झाले आहे. काही कामगारांनी जी काही तुटपुंजी रक्कम पदरमोड करुन जमा केली होती, ती लॉकडाउनच्या पहिल्या सत्रातच संपली.