घोडबंदर : ठाणे जिल्ह्यातील कंपन्या आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कामगार उपायुक्त कार्यालयात सध्या पावसाच्या जलधारा सुरू असून इमारतीला लागलेल्या गळतीमुळे कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील होऊन बसले आहे. एमआयडीसीला दरमहिना १ लाख ५५ हजार भाडे मोजूनही या कार्यालयावर पावसात काम करण्याची वेळ आली आहे. मागील तीन वर्षांपासून उद्भवलेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल कर्मचारी करत आहेत. याबाबत, एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता या इमारतीची लवकरच दुरु स्ती केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. पुढील पावसाळ्यात पाणीगळती होणार नाही, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)पूर्वी कामगार उपायुक्त कार्यालय हे नुरीबाबा दर्गा येथे होते. सहा वर्षांपासून ते वागळे इस्टेट येथे स्थलांतरित झाले आहे. ही जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. सहा मजली असलेल्या या इमारतीत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, लेबर कोर्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय आणि सहाव्या मजल्यावर कामगार उपायुक्तांचे कार्यालय आहे. सहाव्या आणि पाचव्या मजल्यांना पावसाच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. सहाव्या मजल्यावर झिरपणाऱ्या पाण्याचा फटका प्रदूषण कार्यालयालादेखील बसला असून प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर असलेला पीओपी स्लॅब पडलेला आहे. या पाणीगळतीची तक्र ार अनेकदा करूनही एमआयडीसी त्याकडे कानाडोळा करत आहे. पावसाळा संपल्यानंतर आर्थिक तरतूद करून इमारतीवर पत्र्यांचे शेड टाकले जाणार असल्याचे कामगार उपायुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
एमआयडीसी कार्यालयाला गळती
By admin | Updated: October 13, 2016 03:47 IST