२० महिन्यांत पोलीस हेल्पलाइन ३८ हजार वेळा खणखणली, आरटीआयखाली माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:08 IST2018-11-08T03:08:44+5:302018-11-08T03:08:52+5:30
मागील २० महिन्यांत ठाणे शहर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक जवळपास ३८ हजार वेळा खणखणला, अशी माहिती ठाण्यातील अधिकार फाउंडेशन या संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे.

२० महिन्यांत पोलीस हेल्पलाइन ३८ हजार वेळा खणखणली, आरटीआयखाली माहिती उघड
ठाणे : मागील २० महिन्यांत ठाणे शहर पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक जवळपास ३८ हजार वेळा खणखणला, अशी माहिती ठाण्यातील अधिकार फाउंडेशन या संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे. यामध्ये कळवा आणि मुंब्य्रातून सर्वाधिक तक्रारींचे कॉल हेल्पलाइनवर आल्याची माहिती पोलिसांनी फाउंडेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष इमरान चौधरी यांनी दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नागरिकांच्या मदतीसाठी १०० हा हेल्पलाइन नंबर सुरू झाला. त्यानंतर, २००८ मध्ये महिला, मुले आणि वयोवृद्धांसाठी १०३ हा विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. याचदरम्यान, अधिकार फाउंडेशन या संस्थेने २०१३ ते २०१८ पर्यंत ठाणे नियंत्रण कक्षामधील हेल्पलाइन नंबरवर किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर, तक्रारीनंतर किती वेळेत मदतकार्य मिळाले. तसेच तक्रारदारांचा नंबर स्थानिक पोलिसांना दिला जातो का, अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. यावेळी पोलिसांनी २०१३ ते नोव्हेंबर २०१६ दरम्यानच्या तक्रारींबाबत तांत्रिक कारण पुढे केले आहे. त्यानंतर, डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ पर्यंतची माहिती पोलिसांनी फाऊंडेश्नला दिली आहे. त्यानुसार, ठाणे शहर पोलिसांच्या एकूण हेल्पलाइन नंबर १००, १०३, १०९० आणि २५४४३५३५ या नंबरवर ३७ हजार ७८२ तक्रारींचे कॉल आल्याची माहिती दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. यामध्ये, १०० नंबर या हेल्पलाइनवर ३१ हजार ४६८ तर १०३ या नंबरवर ३९४ कॉल आल्याचा समावेश आहे. तसेच उर्वरित सहा हजार तक्रारी इतर हेल्पलाइन नंबर आल्याचे म्हटले.
दरम्यान, १०० आणि १०३ हा नंबर कधीकधी लागत नसल्याचेही चौधरी यांनी सांगितले. तसेच तक्रारीनंतर पोलीस जरी पाच ते सात मिनिटांत पोहोचत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, तेवढ्या वेळेत बऱ्याचदा पोलीस पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर, कळवा आणि मुंब्रा येथून सर्वाधिक जास्त तक्रारी आल्याने त्या परिसरात पोलीस गस्त आणि पोलीस पेट्रोलिंग वाढण्याची मागणी चौधरी यांनी केली आहे.