उत्तन येथे कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:18 AM2019-12-08T00:18:05+5:302019-12-08T00:18:42+5:30

महसूल विभाग, महापालिकेचे दुर्लक्ष

Landfill bark in Kandavalan at Uttan | उत्तन येथे कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

उत्तन येथे कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

Next

मीरा रोड : भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी नवीखाडी येथे मोठ्या प्रमाणात भराव करून भूमाफियांकडून बांधकामे केली जात आहेत. येथील कांदळवन नष्ट करून भराव-बांधकामे सुरूच आहेत. नव्याने भराव आणि मोठी कांदळवनाची झाडे मृत झाल्याचे आढळून आले आहे. भूमाफियांनी घातलेल्या हैदोसामुळे या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारींकडे महापालिका, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक जागरूक नागरिकांनी केला आहे.

समुद्रकिनाऱ्यालगत असलेली उत्तनची नवीखाडी पालीपर्यंत विस्तारलेली आहे. या पात्र परिसरात दाट कांदळवन आहे; पण काही वर्षांत उत्तननाक्यापासून पालीपर्यंत या नवीखाडी पात्रात महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. काहींनी मोठे बंगले बांधले आहेत, तर अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव आणि बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची मोठी कत्तल करण्यात आली असून याप्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही लोकांवर गुन्हेही दाखल केले होते.

खाडीपात्र आणि कांदळवनात केलेला भराव-बांधकामांमुळे भरतीचे पाणी आतपर्यंत येणे बंद झाले आहे. कचरा, पण मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे खाडीत सोडले जाणारे सांडपाणी तुंबून राहत आहे. पावसाळ्यात तर नवीखाडी आणि पात्र परिसरातील या बेकायदा भराव-बांधकामांमुळे काही वर्षांपासून सतत पूरस्थिती निर्माण
होत आहे.

कमरेभर पाणी रस्त्यावर आणि आजूबाजूच्या घरांमध्ये साचल्याने जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. याविरोधात स्थानिक जागरूक नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही महापालिका, महसूल विभागाचे
सोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप सुरू आहे.

याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तलाठी उत्तम शेडगे यांनी तक्रारीनंतर पाहणी करून वरिष्ठांना अहवाल दिल्याचे सांगितले. पण, पर्यावरणाच्या ºहासाबाबत आणि गुन्हा दाखल करण्याबाबत मात्र शेडगे यांनी बोलणे टाळले.

कांदळवनाची झाडे तोडली आणि भराव केला, त्याबाबत मीच तलाठी यांना तक्रार करून पंचनामा करायला लावले. तलाठी कारवाई करत नसेल तर तहसीलदारांकडे तक्रार करू. भराव व बांधकामप्रकरणी माझ्यासह सहकारी नगरसेवक एलायस बांड्या आणि नगरसेविका हेलन जॉर्जी यांनी सतत महापालिका अतिक्रमण आणि आरोग्य विभागास तक्रारी करूनही ते कारवाई करत नाहीत.
- शर्मिला गंडोली, नगरसेविका

संगनमताशिवाय अशक्य

महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत आणि आशीर्वाद असल्याशिवाय नवीखाडी पात्र आणि परिसरात कांदळवनाची कत्तल करून बेकायदा भराव-बांधकामे होणे शक्यच नाही, असा आरोप माजी नगरसेवक जोजफ घोन्सालवीस यांनी केला आहे. पालिकेचाही यात सहभाग आहे. या बांधकामांना वीज, पाणी आदी सुविधा मिळतात कशा? आमची गावे आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर नवी खाडीपात्रातील भराव व बेकायदा बांधकामे तातडीने हटवायला हवीत, अशी मागणीही घोन्सालवीस यांनी केली.

Web Title: Landfill bark in Kandavalan at Uttan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.