उल्हासनगरात ट्रक आणि टँकर पार्किंगचा अभाव, पार्किंगची मागणी, वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:39 IST2025-10-15T18:37:28+5:302025-10-15T18:39:26+5:30
Ulhasnagar: उल्हासनगर शहरांत ट्रक व टँकरसाठी अधिकृत पार्किंग नसल्याचा फायदा वाहतूक पोलिसांनी घेत ऐण दिवाळीत दंडात्मक कारवाई सुरू केल्याने वाहतूकदार हैराण झाले. अप्रत्यक्ष शहरांची सेवा करणाऱ्या ट्रक व टँकरसाठी ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी वाहतूकदार संघटनेने महापालिका आयुक्ताकडे केली.

उल्हासनगरात ट्रक आणि टँकर पार्किंगचा अभाव, पार्किंगची मागणी, वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
उल्हासनगर - शहरांत ट्रक व टँकरसाठी अधिकृत पार्किंग नसल्याचा फायदा वाहतूक पोलिसांनी घेत ऐण दिवाळीत दंडात्मक कारवाई सुरू केल्याने वाहतूकदार हैराण झाले. अप्रत्यक्ष शहरांची सेवा करणाऱ्या ट्रक व टँकरसाठी ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी वाहतूकदार संघटनेने महापालिका आयुक्ताकडे केली.
उल्हासनगरात ३०० पेक्षा जास्त ट्रक-टँकर वाहतूकदारांची संख्या असताना, त्यांच्यासाठी महापालिकेकडून अधिकृत पार्किंग व्यवस्था नाही. कॅम्प नं-३ येथील सपना गार्डन, हिराघाट यांच्यासह मिळेल त्या जागी रस्त्यातील बाजूला अनधिकृतरीत्या वाहने पार्किंग करण्याची वेळ वाहतूकदारावर आली. दिवाळी सणा दरम्यान वाहतूक पोलिसांनी ट्रक व टँकर यांना टार्गेट करून दंडात्मक कारवाईचा सफाटा लावल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला असून वाहतूकदार मानसिक तणावाखाली आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका वाहतूकदारांची पत्नी रुग्णालयात अत्यवस्थ असल्याने, धंदा बुडवून वाहन तीन दिवस एकाच जागी पार्किंग केले होते. त्याला वाहतूक पोलिसांनी तब्बल १७ हजाराची दंडात्मक कारवाई केली. याप्रकारणे वाहतूकदार असंतोष पसरला आहे.
दंडात्मक कारवाई थांबाविण्याची मागणी
उल्हासनगर-कल्याण ट्रक, टँकर ओनर्स वेल्फेअर अससिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पीआरपीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले, संघटनेचे अध्यक्ष कुलविंदरसिंग बैस, उपाध्यक्ष मस्तराम धिमाण, सचिव प्रमोद शिंदे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानंतर महापालिकेकडे ट्रक टर्मिनलची मागणी केली. ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई थांबावी. यासाठी वाहतूक पोलीस विभागाला निवेदन दिले.
ट्रक टर्मिनलचा प्रस्ताव प्रलंबित
विठ्ठलवाडी येथील अंब्रोसिया हॉटेलच्या मागे आठ एकराचा एक भूखंड उपलब्ध आहे. त्यावर ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे. अशी मागणी माजी नगरसेवक व पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली. तसेच ही मागणी जुनीच असल्याचे सांगितले.
राखीव भूखंड बिल्डरच्या घशात?
ट्रक टर्मिनलसाठी विठ्ठलवाडी येथील भूखंडापूर्वी शहाड येथील एक भूखंड आरक्षित करण्यात आला होता. पण नंतर ते आरक्षण उठवून तो भूखंड एका बिल्डरच्या घशात घालण्यात आला. त्यामुळे उल्हासनगरच्या ट्रक-टँकर वाहतूकदार टर्मिनलपासून वंचित राहिल्याचा आरोप संघटनेने केला.