Thane: भिवंडीत भाजपला खिंडार;भाजपच्या अनुसूचित जमाती सेलच्या जिल्हा अध्यक्षांचा ठाकरे गटात प्रवेश
By नितीन पंडित | Updated: October 30, 2023 19:16 IST2023-10-30T19:14:42+5:302023-10-30T19:16:26+5:30
Bhiwandi News: भिवंडीतील भाजपच्या अनुसूचित जमातीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष महादेव घाटाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Thane: भिवंडीत भाजपला खिंडार;भाजपच्या अनुसूचित जमाती सेलच्या जिल्हा अध्यक्षांचा ठाकरे गटात प्रवेश
- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीतील भाजपच्या अनुसूचित जमातीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष महादेव घाटाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे , तालुका प्रमुख विश्वास थळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटाळ यांच्या सेना प्रवेशाने एकीकडे भाजपला खिंडार पडले आहे तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने आपली रणनीती आखली आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे मागील दहा वर्षांपासून आमदार राहिले आहेत. तर भाजपकडून महादेव घाटाळ यांनी मागील काही वर्षांपासून भिवंडी ग्रामीण भागात आपली राजकीय पालेमुळे रोवली असून भाजपकडून घाटाळ विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र शिंदे भाजप युतीमुळे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार असल्याने घाटाळ यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.घाटाळ यांना ठाकरे गटात घेण्यासाठी माजी आमदार रुपेश म्हात्रे व तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
भिवंडी ग्रामीण मतदार संघावर आता शंभर टक्के शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकविणार असून त्यासाठी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरु केली असल्याची प्रतिक्रिया महादेव घाटाळ यांनी दिली आहे.