खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:52 IST2025-12-18T08:52:17+5:302025-12-18T08:52:31+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खा. नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली.

खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खा. नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली. नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याशी समन्वय साधण्याचे काम म्हस्के करतील. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवलीची धुरा खा. श्रीकांत शिंदेंकडे, तर मिरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आला आहे.
ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शिंदेसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा झाला. त्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तीत ठाणे जिल्हा आणि परिसरातील सर्व महापालिकांबाबत सविस्तर चर्चा झाली. ठाणे महापालिकेची जबाबदारी खा. म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांसाठी खा. शिंदे आणि गोपाळ लांडगे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेची जबाबदारी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे देण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेची धुराही खा. म्हस्के वाहतील. वसई-विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक भाजप समन्वय साधतील, असे जाहीर करण्यात आले. या बैठकीला प्रताप सरनाईक, खा. नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, विजय चौघुले यांच्यासह शिंदेसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जोरबैठकांचा जोर
आता स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होईल. त्या-त्या महापालिका क्षेत्रात जागा वाटप, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची मते आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा केली जाईल. महायुतीतील जागा वाटपात किंवा स्थानिक पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः लक्ष घालून तोडगा काढतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.