कोणार्क रेसिडेन्सीच्या फ्लॅटविक्रीवर बंदी, क्लब, कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:51 IST2018-03-08T06:51:43+5:302018-03-08T06:51:43+5:30
औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे.

कोणार्क रेसिडेन्सीच्या फ्लॅटविक्रीवर बंदी, क्लब, कार्यालय सील
उल्हासनगर - औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे.
उल्हासनगरातील कॅम्प एकमध्ये शहाड स्टेशनशेजारी बंद कंपनीच्या जागेत कोणार्क रेसिडेन्सी आहे. त्यात २६० प्लॅट असून कारवाईमुळे ते अडचणीत आले आहेत.
गेल्यावर्षी मे महिन्यात राज्य सरकारने ही फी भरण्याचे आदेश कोणार्क ग्रूपला दिले होते. मात्र त्यांनी त्याचा भरणा न केल्याने बोट क्लब व कार्यालय सील करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाने दिले. तसेच त्यांच्या फ्लॅट विकण्यावरही निर्बंध घातले आहेत. रजिस्टर प्रबंधक कार्यालयालाही या प्लॅटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.
औद्योगिक क्षेत्राचे निवासी क्षेत्रात रूपांतर केल्याचे शुल्क भरलेले नसतानाही पालिकेच्या नगररचनाकार विभागाने या गृहसंकुलाला बांधकामाची परवानगी कशी दिली, असा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे यांनीही गृहसंकुलाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि इतर परवानगी दिली नव्हती. या प्रकारावरून संतापलेल्या भाजपाच्या एका नगरसेवकाने करपे यांच्या कार्यालयात धिंगाणा घालून आत्मदहनाची धमकी दिल्याची चर्चा त्यावेळी पालिका वर्तुळात रंगली होती.
कोणार्क ग्रुप अडचणीत?
राज्यासह देशात अनेक ठिकाणी कोणार्क ग्रूपने महापालिकांच्या जकात वसुलीचा ठेका घेतला होता. तसेच कोट्यवधींच्या निधीतून विकासात्मक योजना राज्यात राबवल्या. उल्हासनगर पालिकेत कोणार्कने ३०० कोटीची पाणी वितरण योजना उभारली. कचरा उचलण्याचा ठेका याच कोणार्क कंपनीकडे आहे. असे असूनही वर्षभरात कोणार्क रेसिडेन्सीने साडेनऊ कोटी सरकारकडे न भरल्याने हा ग्रूप आर्थिक अडचणीत सापडल्याची चर्चा पालिकेत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. मात्र कंपनीने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
बघ्याची भूमिका
कोणार्क गृहसंकुलात फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी महापालिकेकडे विचारणा करा. तोवर खरेदी करून नका, अशा आशयाचा फलक पालिकेने लावला होता. तो उखडून फेकून देण्यात आला. तरीही पालिका बघ्याच्या भूमिकेत आहे.