केडीएमसीची पहिली ई-लर्निंग शाळा

By Admin | Updated: August 15, 2015 23:13 IST2015-08-15T23:13:03+5:302015-08-15T23:13:03+5:30

संगणकाच्या अभावात एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणकीय ज्ञान दुरापास्त झाले असताना मोहने येथील शांताराम महादू पाटील ही शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे.

KDMC's first e-learning school | केडीएमसीची पहिली ई-लर्निंग शाळा

केडीएमसीची पहिली ई-लर्निंग शाळा

- प्रशांत माने,  कल्याण
संगणकाच्या अभावात एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणकीय ज्ञान दुरापास्त झाले असताना मोहने येथील शांताराम महादू पाटील ही शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. संगणकीय कक्षाबरोबरच ई-लर्निंग शाळा या ठिकाणी सुरू केली असून असा उपक्रम राबविणारी महापालिकेची ही पहिलीच शाळा आहे. असे असले तरी समूह साधन केंद्र असलेल्या या शाळेला घटत्या पटसंख्येचे ग्रहण लागले असून आजूबाजूच्या खाजगी शाळांच्या वाढत्या पसाऱ्याचा हा परिणाम आहे.
मराठी माध्यमाची ही शाळा असून या समूह साधन केंद्राच्या अखत्यारीत ५ शाळा येतात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते. सद्य:स्थितीला शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १६० इतकी आहे. शाळाशाळांमध्ये १ किमीचे अंतर बंधनकारक असताना हा नियम या ठिकाणीही पायदळी तुडविला गेल्याचे दिसते. परिसरात ४ ते ५ खाजगी शाळा असल्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम झाल्याचे दिसते. शाळेची वास्तू दुमजली आहे. या ठिकाणी आठ वर्गखोल्या असून यामध्ये पंखे, वीज आणि बेंचेस तसेच फळा आदी सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. शाळेला भव्य मैदान लाभले असून मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रसाधनागृहाची सोयदेखील उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे ई-लर्निंगची सुविधा देणारी केडीएमसीची ही एकमेव शाळा आहे. महापालिकेतील स्वीकृत लोकप्रतिनिधींच्या निधीतून ही सुविधा लाभली आहे. तसेच इंटरनेटही देण्यात आले आहे. शाळेत संगणक विशेष कक्ष उघडला असून तेथील पाचही संगणक सुस्थितीत सुरू आहेत. दरम्यान, समूह साधन केंद्र असूनही सफाई आणि सुरक्षा कर्मचारी दिलेला नाही.
या ठिकाणी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक कार्यरत असून आणखी एका शिक्षकाची आवश्यकता आहे. शालेय पोषण आहार नियमितपणे विद्यार्थ्यांना मिळत असून बहुतांश शैक्षणिक साहित्य उशिरा का होईना त्यांना मिळाले आहे. परंतु, गणवेश आणि बुटांना मुहूर्त मिळालेला नाही.

Web Title: KDMC's first e-learning school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.