कासारवडवली पोलिसांनी महिलेला मिळवून दिली एक लाखांची सोन्याची बांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:09 IST2020-01-12T21:53:56+5:302020-01-12T22:09:46+5:30
कासारवडवली या भूमी एकर्स परिसरातून कामानिमित्त पायी जात असताना आकांक्षा श्रीवास्तव या महिलेची तीन तोळ्यांची एक लाखांची सोन्याची बांगडी हरवली होती. तिचा कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये शोध घेऊन ती शनिवारी त्यांना परत केली. आईची आठवण असलेली बांगडी परत मिळवून दिल्याने आकांक्षा श्रीवास्तव यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

यवतमाळमध्ये लागला शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हिरानंदानी इस्टेट, कासारवडवली या भूमी एकर्स परिसरातून कामानिमित्त पायी जात असताना आकांक्षा श्रीवास्तव या महिलेची तीन तोळ्यांची एक लाखांची सोन्याची बांगडी हरवली होती. तिचा कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये शोध घेऊन ती शनिवारी त्यांना परत केली. रेझिंग डे च्या औचित्याने पोलिसांनी मेहनत घेऊन आईची आठवण असलेली बांगडी परत केल्याने आकांक्षा श्रीवास्तव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हिरानंदानी इस्टेट येथे राहणाऱ्या श्रीवास्तव या ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ‘भूमी एकर्स’ परिसरातून आपल्या काही कामानिमित्त पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या हातातील तीन तोळ्यांची सोन्याची बांगडी रस्त्यावर पडून गहाळ झाली होती. बराच शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे त्याबाबत त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार आर.एस. चौधरी आणि आर.एस. महापुरे यांनी घटनास्थळी जाऊन अनेक सीसीटीव्हींच्या फुटेजची पडताळणी केली. शिवाय, १०० ते १५० महिलांकडेही चौकशी केली. अखेर, एका सीसीटीव्हीमध्ये एक महिला ती बांगडी उचलून घेऊन जाताना आढळले. ती खासगी सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आली. या सुरक्षारक्षक कंपनीतून तिच्या नावाची माहिती काढून तिचा शोध घेतला असता, ती वाघबीळ येथे राहणारी होती. मात्र, ती यवतमाळ येथे गेली होती. तिला मोबाइलद्वारे विश्वासात घेतल्यानंतर तिने ही बांगडी सापडल्याचे पोलिसांना सांगितले. तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांच्या मार्फतीने या महिलेची बांगडी ११ जानेवारी रोजी परत केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी ओळख पटवून श्रीवास्तव यांना त्यांची बांगडी परत केल्याने त्यांनीही पोलिसांचे आभार मानले.