कापूरबावडी उड्डाणपूल सोमवारी खुला
By Admin | Updated: August 16, 2015 02:10 IST2015-08-16T02:10:24+5:302015-08-16T02:10:24+5:30
मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु

कापूरबावडी उड्डाणपूल सोमवारी खुला
ठाणे : मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु वाहतूककोंडीमुक्त प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आता ७० टक्के वाहतूक ही या लेनवरून केली जाणार असल्यामुळे कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लेनचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. दरम्यान, येथील चार लेन यापूर्वीच खुल्या करण्यात आल्या आहेत. पण मुंबईकडे जाणारी लेन मात्र सुमारे सात वर्षे रखडली होती. या लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणून याचा शुभारंभ रखडला असल्याचा गवगवा करण्यात आला होता. परंतु, वाहनचालकांना होणारा विलंब आणि कोंडी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करून ही लेन खुली करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही किरकोळ कामे शिल्लक असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.
मधल्या कालावधीत या पुलाला तडे गेल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा शुभारंभ लांबणीवर पडला. यासंदर्भात अधिक चौकशीसाठी पालकमंत्र्यांनी एकसदस्यीय समितीही नेमली होती. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही लेन खुली करण्याचा दावा केला होता. परंतु, त्यानंतर दोन वेळा या लेनची लोड टेस्ट घेण्यात आली. त्यानंतरही केवळ समितीचा अहवाल न आल्याने ही लेन खुली करता येत नसल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. परंतु, आता तिचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करून ती सोमवारी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना आता घोडबंदर, बाळकुम येथून येणाऱ्या वाहनांना थेट मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या येथील मार्गावरून २५ ते ३० हजार वाहने रोज मुंबईच्या दिशेने जात आहेत. परंतु, ही लेन खुली न झाल्याने त्याचा ताण कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवर पडत होता. मात्र, आता ही लेन खुली होत असल्याने ७० टक्के वाहने तिचा वापर करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी तर सुटलेच तसेच मुंबईतही लवकर पोहोचता येणार आहे. (प्रतिनिधी)