उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता निकृष्ट; महापौराच्या पाहणीनंतर ३ ब्लॉक बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:22 IST2026-02-10T18:21:40+5:302026-02-10T18:22:25+5:30
शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याची महापौर अश्विनी निकम यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून रस्त्याच्या बांधणीवर प्रश्नचिन्हे उभे केले होते.

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता निकृष्ट; महापौराच्या पाहणीनंतर ३ ब्लॉक बदलणार
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याची महापौर अश्विनी निकम यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून रस्त्याच्या बांधणीवर प्रश्नचिन्हे उभे केले होते. अखेर रस्त्यातील निकृष्ट बांधलेले ३ ब्लॉक काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरच्या मधोमध जाणारा कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काम ६८ कोटीच्या निधीतून तीन टप्प्यात मंजूर केले. दरम्यान महापालिका भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षे उशिराने सुरू झाले. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, सुरवातीपासूनच रस्ता वादात सापडला. रस्ता निकृष्ट बांधला जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी महापौर अश्विनी निकम, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, कमलेश निकम यांच्यासह राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर, महापालिका कार्यकारी अभियंता निलेश सिरसाट, उपअभियंता संदीप जाधव आदी अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी रस्त्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली.
महापौर अश्विनी निकम यांच्या रस्ता पाहणी व नाराजीनाट्य नंतर राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी सबंधित अभियंताना रस्त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. रस्त्यातील निकृष्ट ३ ब्लॉक कापून नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती मानकर यांनी दिली. प्रत्यक्षात संपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व राजकीय पक्षाचे नेत्याकडून होत आहे. रस्तावर रस्ता बांधला जात असल्याने, रस्ता ऐक ते दिड फूट उंच झाला. उंच रस्त्याने रस्ता शेजारील दुकाने व घरात पावसाने पाणी जाईल म्हणून आमदार कुमार आयलानी यांनी सुरवातीला विरोध केला होता. मात्र त्यानंतर आयलानी यांचा विरोधात मावळला आहे.
"महापौर अश्विनी निकम यांनी कल्याण ते अंबरनाथ रस्त्याची पाहणी केल्यावर, रस्ता निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. महापौराच्या पाहणीनंतर रस्त्यात निकृष्ट असलेल्या तीन ब्लॉक बदलण्याचा निर्णय घेऊन, बदलण्याचे काम सुरू केले. "
प्रशांत मानकर - कार्यकारी अभियंता, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, उल्हासनगर