प्रसुतीगृह मार्गी न लागल्यास कचऱ्यामध्ये बसून आंदोलन करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 16:47 IST2019-02-09T16:16:38+5:302019-02-09T16:47:40+5:30
डोंबिवली येथील टिळक पथवर अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहाची घरघर अखेर संपणार असून त्यासंदर्भातील वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

प्रसुतीगृह मार्गी न लागल्यास कचऱ्यामध्ये बसून आंदोलन करणार
डोंबिवली - डोंबिवली येथील टिळक पथवर अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहाची घरघर अखेर संपणार असून त्यासंदर्भातील वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी त्या प्रकल्पाच्या कामाची लेखी प्रत मिळवण्यासाठी, व तो प्रकल्प तात्काळ मार्गी लागण्यासाठी हालचाल न झाल्यास मनसे स्टाईलने कचऱ्यामध्ये ठिय्या मांडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात नुकतीच त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठक झाली होती, तो प्रलंबित, धूळखात पडलेला प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यात चर्चा झाली होती. त्यानूसार पुढील आठवड्यात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार होते, त्या आंदोलनामध्ये सध्या तेथे झालेल्या प्लास्टिकच्या डंपिंगबद्दल संताप व्यक्त करण्यात येणार असून त्या कचऱ्यातच बसून महापालिकेच्या निष्क्रियतेबाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात मंगळवारी तसे आंदोलन करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
लोकमतच्या हॅलो ठाणे मधील वृत्तानूसार जर प्रकल्प मार्गी लागणार असेल तर आनंदच आहे, पण त्याचे लेखी पत्र आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. लेखी उत्तर मिळाले की त्या प्रमाणे महापालिकेने वाटचाल न केल्यास जाब विचारणे सोपे जाते असेही ते म्हणाले. नागरीप्रश्नांसंदर्भात लोकमतची तत्परता देखील खूप स्तुत्य असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.