कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST2019-06-01T00:16:28+5:302019-06-01T00:16:42+5:30

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी : दोन्ही विहिरींतील पाणी पिण्यास अयोग्य

Kalamgaon's water shortage? | कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

जनार्दन भेरे 

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, कितीही उपाययोजना करूनही पाणीटंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यापैकी एक गाव म्हणजे कळमगाव. दिवसेंदिवस येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे गावपाड्यांत पाणी पुरवणे आता कठीण होऊन बसले आहे.

तालुक्यातील कळमगाव हे मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेले गाव. या गावातूनच रेल्वेमार्ग जातो. या गावाची लोकसंख्या आजमितीस दोन हजारांपर्यंत. गावात पाणीयोजना आहे खरी, मात्र तिला पाणी येणे शक्य नाही. या योजनेची अनेक लहानमोठी कामे होणे बाकी आहे. पण, या गावासाठी असणाऱ्या साखरोली तलावातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. या तलावातील पाण्याचे स्रोत पाऊस लवकर गेल्याने लवकरच बंद झाले आणि तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्याचा परिणाम असा झाला की, आज ज्या पाणीयोजना या पाण्यावर अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

या गावात तशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींना पिण्यासारखे पाणी नाही. आज जे पाणी आहे, त्या पाण्याचा सतत वापर न केल्याने ते खराब झाले असून ते पिण्यास लायक नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज गावात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. हे गाव तानसा तलावाच्या खोºयापासून दीड किमी अंतरावर असूनही या गावातील विहिरींमध्ये पाणी नाही. गावात असणाऱ्या बहुतांशी बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत.

दरम्यान, शहापूर तालुक्याच्या विविध भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना चार ते पाच किलोमीटर चालून पाणी आणावे लागत आहे. संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो असे या महिलांनी सांगितले. प्रशासनाने उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kalamgaon's water shortage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.