ठाण्यात जल्लोष अन् उत्साह; लोकमत महामुंबई महामॅरेथॉन नातवासह धावल्या आजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 09:57 IST2023-12-05T09:56:25+5:302023-12-05T09:57:27+5:30
लोकमत महामुंबई महा मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी ठाण्यात संपन्न झाली. हजारो स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. महामुंबई महा मॅरेथॉनसाठी पहाटे चार ...

ठाण्यात जल्लोष अन् उत्साह; लोकमत महामुंबई महामॅरेथॉन नातवासह धावल्या आजी
लोकमत महामुंबई महामॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी ठाण्यात संपन्न झाली. हजारो स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. महामुंबई महामॅरेथॉनसाठी पहाटे चार वाजल्यापासून रेमंड ग्राऊंडवर स्पर्धक जमायला सुरूवात झाली. धावण्यापूर्वी वॉर्मअप एक्सरसाइज करण्याकरिता अनेक स्पर्धक पहाटेच ग्राऊंडवर जमा झाले होते. स्टेजसमोरच संगीताच्या तालावर स्पर्धकांनी वॉर्मअप सेशन घेतले. त्यातून त्यांचा उत्साह आणि एनर्जी वाढली. अनेक धावपटूंचे ग्रुप एकत्र होते. काही स्पर्धक लांबून आल्याने त्यांनी रात्री ठाण्यातच मुक्काम केला होता. अनेकांचे पेसर्स आणि प्रशिक्षक स्पर्धकांबरोबर होते.
नातवासह धावल्या आजी
महामॅरेथाॅन ॲन्थमच्या तालावर २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला पहिला झेंडा दाखविला. त्यानंतर १० किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनला मान्यवरांनी झेंडा दाखवत स्पर्धेला सुरूवात केली. रेमंंड मैदानावर मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा रंगला. त्यामध्ये पुरस्काराची घोषणा होताच डीजेवर लावण्यात आलेल्या गाण्यांच्या तालावर धावपटू थिरकले. यावेळी लहान मुलांपासून आजीबाईंपर्यंत सारेच बेधुंद झाले होते. दिव्यांगांचा स्पर्धेतील सहभाग लक्षणीय होता.
स्पर्धकांत ऊर्जा
महामॅरेथॉन मार्गावर विविध संस्थांनी धावपटूंचे मनोबल वाढविले. फ्लॅग ऑफ एंटरटेन्मेंट येथे मोरया बिट्स, पिंपळपाडा (ठाणे) या बँड पथकाने तालबद्ध पद्धतीने बँड वाजवत स्पर्धकांत ऊर्जा भरली. सावित्रीबाई थिरानी विद्यामंदिर शाळेच्या बँड पथकाने कला सादर केली.
खासदारांच्या पत्नीही धावल्या
खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी लोकमत महामुंबई महामॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन तीन किलोमीटर अंतर पूर्ण केले. मी या मॅरेथॉनमध्ये महिला सबलीकरणासाठी धावले.
एक हात नसतानाही जिद्दीने धावले
५८ वर्षीय सुरेश वेलणकर यांना एक हात नसतानाही त्यांनी २१ किमी अंतराची लोकमत महामुंबई महामॅरेथॉन एक तास ५४ मिनिटांत पूर्ण केली. लोकमतचे आयोजन चांगले आहे. गेली दोन वर्षे मॅरेथॉनमध्ये सहभागी असणाऱ्या वेलणकर यांनी समाधान व्यक्त केले.
वाढदिवसाची सुरुवात महामॅरेथॉनने
ॲथलेटिक्स खेळाडू असलेल्या आयान (वय ९) आणि नविष्का सोलंकी (वय ११) या दोघा भाऊ-बहिणीने महामॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. तीन कि. मी. धावलेल्या आयानचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाची सुरूवात महामॅरेथॉनने केल्याची माहिती आयानच्या पालकांनी दिली.
महामुंबई महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करतो. आमचे स्पॉन्सर्स, धावपटू व व्हॉलेंटियर्स यांच्या सहकार्यामुळे महामॅरेथॉनने यशाचे नवे शिखर गाठले. या साऱ्यांच्या इच्छाशक्तीमुळे मॅरेथॉन यशस्वी व निर्विघ्नपणे पार पडली. हा मॅरेथॉनचा प्रवास असाच यापुढेही सुरू राहील हीच अपेक्षा आहे. मॅरेथॉनमधील धावपटूंची लवकरच छत्रपती संभाजीनगर येथील महामॅरेथॉनमध्ये भेट होईल, हीच अपेक्षा आहे. या यशस्वी महामॅरेथॉनचा एक भाग होण्याचे सौभाग्य लाभले, याचा आनंद आहे. - संजय पाटील, रेस डायरेक्टर, महामॅरेथॉन