ठाणे : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ‘मिशन भरारी’ या अभिनव उपक्रमाला यंदा विशेष उंची मिळत असून निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यासदौरा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २७ एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे. जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छांसह प्रयाण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी थेट जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ठरत आहे.
प्रजासत्ताक दिनी प्रारंभ झालेल्या या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत आयोजित या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांना देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
या अभ्यासदौऱ्याची संकल्पना ठाणे जिल्हाधिकारी डाँ. श्रीकृष्ण पाचाळ यांनी मांडली असून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली तो राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान समजून घ्यावे, मोठी स्वप्ने पाहावीत, यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना इंडियन स्पेस रिसर्च आँरर्गेनायजेशन अंतर्गत विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा रॉकेट प्रक्षेपण केंद्र, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम व प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम येथे प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. यासोबतच स्वामी विवेकानंद स्मारक आणि थिरुवल्लुवर पुतळ्यालाही भेट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचीही संधी मिळणार आहे.
निवड झालेल्या ५९ विद्यार्थ्यांमध्ये २७ मुले आणि ३२ मुलींचा समावेश असून विविध तालुक्यांतील ग्रामीण पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
“‘मिशन भरारी’ हा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे दालन उघडणारा उपक्रम आहे,” असे मत यादव यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज लाभणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Web Summary : 59 Thane students selected under 'Mission Bharari' will visit ISRO. The educational tour, inaugurated by Eknath Shinde, offers rural students exposure to science and technology, including visits to scientific centers and a plane journey.
Web Summary : मिशन भरारी के तहत चयनित 59 ठाणे के छात्र इसरो का दौरा करेंगे। एकनाथ शिंदे द्वारा उद्घाटन किए गए इस शैक्षिक दौरे से ग्रामीण छात्रों को विज्ञान और प्रौद्योगिकी से अवगत कराया जाएगा, जिसमें वैज्ञानिक केंद्रों की यात्रा और विमान यात्रा शामिल है।