धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर प्रयोगशाळा आहे का? परिवहन मंत्र्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:00 IST2025-10-26T09:58:26+5:302025-10-26T10:00:57+5:30
मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर प्रयोगशाळा आहे का? परिवहन मंत्र्यांचा सवाल
मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील बाहेरून नेते येऊन त्याला धार्मिक वळण देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर ही प्रयोगशाळा आहे का? असा संतप्त सवाल परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. बाहेरून येऊन भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना रोखा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे पोलिसांना सांगितल्याचे ते म्हणाले.
मीरारोडच्या माशाचा पाडा भागात डाचकुल पाडा येथे मोठ्या संख्येने रिक्षाआडव्या तिडव्या लावून रस्त्यात अडथळा आणला जातो. त्यावरून रिक्षा चालक आणि रहिवाशी यांच्यात वाद सुरू होता. २१ ऑक्टोबरच्या पहाटे तेथील रिक्षा उभ्या केल्यावरून वादावादी झाली आणि तेथील सुमारे २५ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यातून रिक्षा चालकांच्या टोळीने दांडे, शस्त्र सह येऊन तेथील चौघांना मारहाण केली.
मारहाणीच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. त्यावेळी रहिवाश्यांनी, रिक्षावाल्यांनी स्वतःच रिक्षा फोडल्याचा आरोप केला. जखमी सुमित शाह याच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी ५५ ते ६५ रिक्षा चालक आदींवर गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक केली. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन हा लव्ह आणि लँड जिहादमधून झालेला प्रकार असून विशिष्ट गटाला लक्ष्य करत त्यांची अनधिकृत बांधकामे तोडण्याची आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली.
एमआयएमचे वारीस पठाण हे शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीस उपायुक्त कार्यालयात मोठ्या संख्येने रिक्षावाल्यांसह जमले आणि त्यांनी रिक्षा फोडणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय दबावा खाली एकतर्फी कारवाई केली गेली असा आरोप केला. तोडफोड करणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा असे पठाण यांनी सांगितले.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले कि, महापालिका निवडणुका असल्याने जाणीवपूर्वक काहीजण वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या येऊन काहीही बोलून जातात. एमआयएमचे वारीस पठाण आले त्यांचा शहराशी काय संबंध. या आधी जे पी संकुल प्रकरणी मंत्री नितेश राणे येऊन काहीपण बोलून गेले. सपाचे अबू आझमी येणार होते त्यावेळी आपण त्यांना कॉल करून येऊ नका सांगितले. या बाबत मुख्यमंत्री यांना सांगणार आहे की बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना शांतता हवी आहे. मी आणि नरेंद्र मेहता असे दोन्ही शहरातील महायुतीचे आमदार शहर संभाळतोय. बाहेरच्यांनी येऊन वातावरण बिघडवण्याची गरज नाही. बाहेरून या पुढे कोणी आल्यास त्यांच्या भागात आम्हीपण जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.
डाचकुल पाडा भागात आदिवासी, वन आदींच्या जमिनींवर काही भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली व गरीब लोकांना फसवले. वीज कंपन्यांना हाताशी धरून वीज जोडण्या मिळवून दिल्या. बेकायदा बोअर काढून पाणी विकले जाते. पालिका आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही म्हणून हे फोफावले. याला त्या भागातील स्थानिक काही नेते आणि पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सतत केली आहे असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.