आंतरराज्य शिकलकर टाेळीतील अट्टल चाेरटे जेरबंद: दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2025 19:22 IST2025-09-26T19:22:30+5:302025-09-26T19:22:53+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी: ४० गुन्हे उघडकीस

आंतरराज्य शिकलकर टाेळीतील अट्टल चाेरटे जेरबंद: दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पुणे, अहिल्यानगर आणि ठाणे परिसरात घरफाेडी, चाेऱ्या करणाऱ्या आंतरराज्य शिकलकर टाेळीतील विजयसिंह अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (२४, रा. हडपसर, पुणे) याच्यासह चार जणांच्या अट्टल चाेरटयांनाअटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून साेन्या, चांदीच्या दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टाेळीचे तब्बल ४० गुन्हे उघडकीस आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घरफाेडी चाेरीचे अनेक गुन्हे घडले होते. बंद घरे फोडून मोठया प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने तसेच राेख रक्कमही चाेरी झाली हाेती. चाेरीचे गुन्हे उघडीस आणण्याचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे आढावा बैठकीत अलिकडेच दिले हाेते. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पाेलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण युनिटचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाकडून समांतर तपास सुरु हाेता. गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे या पथकाने आरोपींचा शाेध सुरु केला. यापूर्वी चाेरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टाेळीतील सराईत चाेरटयांवरही पाळत ठेवली. यातूनच विजयसिंग आणि साेनूसिंग जुन्नी (२७, दाेघेही राहणार हडपसर, पुणे ) या दाेघांना ८ सप्टेंबर २०२५ राेजी डाेंबिवलीमध्ये सापळा लावून ताब्यात घेतले. त्यापाठाेपाठ सन्नी सरदार (२७, आंबिवली, कल्याण ) आणि अतुल खंडाळे उर्फ खंडागळे ( २४, रा. हडपसर, पुणे ) यांना ताब्यात घेतले. चाैकशीत ठाणे, नवी मुंबईतील घरफाेडीचे ४० गुन्हे उघडकीस आले. चाेरीसाठी वापरलेली कार आणि साेन्या चांदीचे दागिने असा ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
विजय जुन्नी विरुद्ध २० गुन्हे - विजयसिंगविरुद्ध मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, नवी मुंबई आणि अहिल्यानगरमधील पाेलीस ठाण्यांमध्ये चाेरीचे यापूर्वी २० गुन्हे दाखल आहेत. साेनूसिंग याच्याविरुद्ध पुण्याच्या देहूराेड आणि लाेणीकंदमध्ये चाेरीचे तीन तर खंडाळे याच्याविरुद्ध मुंबईतील टिळकनगर, पुण्यातील वालचंदनगर आणि यवत तसेच अहिल्यानगरमधील राहूरी पाेलीस ठाण्यात चाेरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. खंडाळे हा कार चालवायचा. तर इतर तिघे बंद घरे हेरुन चाेरी करायचे.