६७६ गावे पितात दूषित पाणी, आरोग्य विभागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:22 IST2019-06-11T01:22:07+5:302019-06-11T01:22:52+5:30
आरोग्य विभागाची पाहणी : २७६६ जलस्रोत सौम्य दूषित, स्वच्छता सर्वेक्षण अभियान

६७६ गावे पितात दूषित पाणी, आरोग्य विभागाची पाहणी
ठाणे : एकीकडे पाणीटंचाईच्या झळांमुळे ग्रामीण भागातील नागरिक हैराण असतानाच आता जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ६७६ ग्रामपंचायतींचे जलस्रोत मध्यम दूषित, तर दोन हजार ७६६ जलस्रोत सौम्य दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे तसेच दर सहा महिन्यांनी जलस्रोतांच्या करण्यात येणाºया तपासणीमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील तीव्र दूषित पाण्याच्या स्रोतांचे प्रमाण हे मध्यमपर्यंत आले आहे. तर, दोन तालुक्यांमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये तीव्र दूषित स्वरूपाचे पिण्याचे पाणी असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यात सर्वाधिक दोन स्रोत हे तीव्र दूषित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले होते. या अभियानामध्ये जलस्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्रोतांचा परिसर, विहिरी, कूपनलिकांमध्ये झिरपणारे दूषित पाणी यांची पाहणी करून संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरवण्यात आला. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, त्या ग्रामपंचायतींना लाल, कमी दूषित पाण्याचा पुरवठा होणाºया ग्रामपंचायतींना पिवळे, तर स्वच्छ पाणी देणाºया ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात येते. विशेष म्हणजे, ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या कालावधीत एकदाही जलजन्य आजाराची नोंद झाली नाही. त्या गावांना चंदेरी कार्ड देण्यात येणार आहे.
पाच तालुक्यांतील
ग्रामपंचायतींना दिलेले कार्ड
तालुके लाल पिवळे हिरवे
कल्याण ०० २० २६
भिवंडी ०० ०८ ११२
अंबरनाथ ०० ०४ २४
मुरबाड ०२ ९३ ३४
शहापूर ०१ ७५ ३४
एकूण ०३ २०० २२७
म्हसासह तीन ग्रामपंचायतींना लाल कार्ड
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ४३० ग्रामपंचायतींच्या जलस्रोतांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये तीन ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले. त्यामध्ये शहापूर तालुक्यातील वालशेत, कोठाचीवाडी येथील गुर्दे ग्रामपंचायतीतील विहिरीचे पाणी तीव्र दूषित आढळून आल्याने त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आले. तसेच मुरबाड तालुक्यातील वाघिवली, पदूचीवाडी येथील विहीर तर, म्हसा येथील नळपाणीपुरवठा योजनेचे जलस्रोत तीव्र दूषित आढळून आल्याने त्यांनादेखील लाल कार्ड देण्यात आले. तसेच त्यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील आरोग्य विभागाने केल्या आहेत.
शहापूर, मुरबाडच्या २९४ गावपाड्यांना ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
ठाणे : धरण उशाला कोरड घशाला, ही म्हण ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावपाड्यांबाबत नेहमीच खरी ठरत आहे. जून महिना सुरू झाल्यानंतरही पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने या गावपाड्यांतील टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, या दोन तालुक्यांतील २९४ गावपाड्यांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडसह अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यात पाणीटंचाईच्या समस्या भेडसावण्यास सुरु वात होऊन त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यास सुरु वात होत असते.
यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने तब्बल एक महिना आधीपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या आ वासून उभी ठाकली आहे. त्यात यंदा मागील वर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येतदेखील दुपटीने वाढ झाली असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यात ८३ गावे आणि २११ पाड्यांना ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ६२ गावे, १६३ पाड्यांना ३४ टँकरद्वारे, तर मुरबाड तालुक्यातील २१ गावे आणि ४८ पाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.