शहापूर : सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे माहूली किल्ल्यावरील पळसगड येथे आयोजित केलेल्या मोहिमेत ५ ओळींचा देवनागरी लिपीत लिहिलेला शिलालेख सापडला आहे. यासंदर्भात विस्तृत अभ्यास करून शिवकालीन इतिहासाविषयी योग्य माहिती मिळवली जाईल, असे सह्याद्री प्रतिष्ठान, शहापूर विभागाचे गौरव राजे आणि अनिरु द्ध थोरात यांनी सांगितले.माहूली किल्ल्याचे चौथे प्रवेशद्वार गणेश दरवाजा, ते त्याच्या मूळ स्थितीत आणण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पळसगड विशेष मोहीम राबवली होती.या मोहिमेत कार्यरत असताना विभागाचे संघटक तेजस उदिवाल यांच्या नजरेस गणेश शिल्पाच्या बाजूलाच शेवाळात गुरफटलेल्या अवस्थेत काही अक्षरे दिसली. ही अक्षरे निरखून पाहिल्यावर तो ५ ओळींचा शिलालेख असल्याचे लक्षात आले. या देवनागरी लिपीत असलेल्या या शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक करीत आहेत.
माहुली किल्ल्यावर सापडला देवनागरी लिपीतील शिलालेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:11 IST