लक्ष्मीपुजनाच्या पहिल्याच दिवशी हवेतील धुळ आणि ध्वनी प्रदुषणात वाढ
By अजित मांडके | Updated: November 13, 2023 15:37 IST2023-11-13T15:36:27+5:302023-11-13T15:37:26+5:30
फटाक्यांची रात्री उशीरापर्यंत आतीषबाजी, कारवाई मात्र नाहीच

लक्ष्मीपुजनाच्या पहिल्याच दिवशी हवेतील धुळ आणि ध्वनी प्रदुषणात वाढ
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडण्याची परवानगी असतांनाही ठाण्याच्या विविध भागात खासकरुन उच्चभ्रु लोकवस्तीत ध्वनी आणि हवेतील प्रदुषणात वाढ झाल्याची माहिती दिवाळीच्या पहिल्याच दिवशी समोर आली आहे. हिरानंदानी मेडोज आणि इस्टेट या भागात ध्वनी प्रदुषणाची पातळी थेट १०५ डेसीबल पर्यंत पोहचल्याचे दिसून आले. त्यातही रविवारी सकाळपासून फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. ती रात्री दिड वाजेपर्यंत सुरु असल्याचे दिसून आले. मात्र कुठेही कोणावरही कारवाई मात्र करण्यात आल्याचे दिसून आले नाही. तर हवेतील धुळीच्या प्रदुषणात देखील वाढ झाली असून लक्ष्मीपुजनाच्या दिवशी हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १६० वर पोहचला होता. त्यामुळे पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसत असतांना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेची गुणवत्ता घसरल्याने शहराची हवा मध्यम प्रदुषित गटात मोडल्याचे दिसून आले.
फटाक्यांच्या आतषबाजीने ध्वनिप्रदूषण आणि शहरातील हवेची गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून सुरू झालेल्या फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्नीपर्यंत सुरूच होती. पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील रस्त्यांवर आवाजाची तीव्रता १०० ते १०५ डेसिबल इतकी प्रचंड वाढली होती. याशिवाय राम मारु ती रोड, पाचपाखाडी, गोखले रोड, ठाणे पूर्व या भागात देखील आवाजाची पातळी ही ९० ते ९५ डेसिबल इतकी नोंदवण्यात आली आहे. ही आवाजाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेल्या आवाजाच्या नोंदीवरून स्पष्ट केले आहे. दिवाळीतील शोभिवंत फटाक्यांची संख्या वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे हवेच्या प्रदूषणातही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. दिवाळीत ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने दीपावलीपूर्व व दीपावली कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्यानुसार दिवाळीच्या आदल्या दिवशी हवेतील धुळी प्रदुषणाचे प्रमाण सरासरी १०२ एवढे होते. तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपुजनाच्या दिवशी हे प्रमाण १६० सरासरी आढळून आले आहे.
दिवाळीच्या दोन दिवस आधी झालेल्या पावसामुळे हवेतील प्रदुषणात घट झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले होते. त्यानुसार दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी हवेतील धुळी प्रदुषणाचे प्रमाण १०२ एवढे होते. परंतु लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय घोडबंदर, उपवन आणि तिनहात नाका येथील हवेतील प्रदुषणातही वाढ झाल्याचे दिसून आले.
त्यातही रात्री ८ ते १० या कालावधीत फटाके फोडण्याचे निर्देश असतांना देखील रात्री दिड वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात फटाके फोडले जात असल्याचे दिसून आले. त्यातही नियमांचे उल्लघंन करणाºयांवर पोलिसांकरवी कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले असतांनाही पोलिसांकडून कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हिरानंदानी इस्टेट आणि मेडोज राहिले पुढे
दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी ही हिरानंदानी इस्टेट आणि मेडोजमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. येथील ध्वनीप्रदुषणाची पातळी १०० डेसीबल पेक्षा जास्तीची आढळून आली आहे.
ठिकाण - ध्वनी प्रदूषण
पाचपाखाडी - ९० डेसीबल
हिरानंदानी मेडोज - १००
हिरानंदानी इस्टेट - १०५
उपवन - ९० डेसीबल
दिवाळीतील तीन दिवस धोक्याचे
दिवाळीत लक्ष्मीपुजन, पाडवा आणि भाऊबीज या तीन दिवसात शहरातील उच्चभ्रु वस्तीत, राम मारुती रोड, कोपरी पूर्व, पाचपाखाडी या भागात अधिक प्रमाणात ध्वनी आणि हवेतील प्रुदषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
धुळ प्रदुषणाची माहिती (हवा गुणवत्ता निर्देशांक)
दिनांक - घोडबंदर - उपवन - तिनहात नाका - सरासरी
५-११-२०२३ - १०३ - १५६ - ११३ - १२४
६ -११-२३ - ९४ - १४६ - १६१ - १३४
७-११-२३ - ५० - --- - १५९ - १०५
८-११-२३ - ६९ - १८२ - १८७ - १४६
९-११-२३ - -- - १५५ - १३३ - १४४
१०-११-२३ - ६६ - ११० - १२७ - १०१
११-११-२३ - ५७ - १०८ - १४१ - १०२
१२-११-२३ - १४८ - १५४ - १७७ -१६०
धुळ प्रदुषण कमी
रविवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धुळीच्या प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले असतांना सोमवारी सकाळी मात्र धुळ प्रदुषण कमी असल्याचे समाधानकारक चित्र शहरात दिसत होते. ठाणे शहरात महापालिकेच्या माध्यमातून आरएमसी प्लान्ट बंद करण्यात आले आहेत. नव्याने सुरु असलेली विकासकांची बांधकामांची कामे थांबली आहेत. त्याचा परिमाण सोमवारी दिसून आला.
हवेतील प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना सुरु आहेत. मात्र दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसत आहे. परंतु महापालिकेच्या माध्यमातून बांधकामांची कामे थांबविण्यात आली आहेत. तसेच आरएमसी प्लान्ट बंद करण्यात आल्याने सोमवारी प्रदुषणात घट झाली होती.
(मनिषा प्रधान - प्रदुषण नियंत्रण अधिकारी, ठामपा)
सध्या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. कोणत्या भागात फटाके वेळे नंतर वाजविले गेले त्याची माहिती घेतली जात आहे.
गणेश गावडे - उपायुक्त, परिमंडळ १, ठाणे पोलीस)