ठाण्यात केकमध्ये गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर दोघांचा सामूहिक अत्याचार; कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:13 IST2025-12-08T09:12:06+5:302025-12-08T09:13:38+5:30
या घटनेच्या तीन महिन्यांनंतरही ते तिला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेने धाडस दाखवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठाण्यात केकमध्ये गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर दोघांचा सामूहिक अत्याचार; कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमधील घटना
ठाणे : ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका ३६ वर्षीय विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. दोघांपैकी हिरालाल केदार (५५) याला अटक केली असून, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी रविवारी दिली.
या घटनेच्या तीन महिन्यांनंतरही ते तिला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेने धाडस दाखवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीतील एका स्पा सेंटरमध्ये ही पीडित महिला कामाला होती. त्याठिकाणी स्वत:ला युट्यूब पत्रकार असल्याचा दावा करणारे रवी आणि हिरालाल दोघे मसाजसाठी नेहमी येत होते. रवीने २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा असल्याचा बहाणा करून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये नेले होते.
ब्लॅकमेलिंग करून छळवणुकीसह धमकी
या घृणास्पद प्रकारानंतर त्यांनी तिला रात्री ११ वाजता रस्त्यावर सोडले. याची कुठे वाच्यता केल्यास तिच्याशी केलेल्या शरीर संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकीही त्यांनी दिली. बदनामीच्या आणि व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडितेने याची तक्रार केली नाही. रवीने २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मासुंदा तलाव आणि ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास कौपिनेश्वर मंदिर याठिकाणी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याला कंटाळून अखेर तिने ५ डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.