Immediately close the corner rail flyover in Dombivli; Traffic congestion unbreakable | डोंबिवलीतील कोपर रेल्वे उड्डाणपूल तत्काळ बंद करा; वाहतूककोंडी अटळ

डोंबिवलीतील कोपर रेल्वे उड्डाणपूल तत्काळ बंद करा; वाहतूककोंडी अटळ

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने बंद करा, असे पत्र कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांना पाठविले आहे. पूल वाहतुकीसाठी बंद न केल्यास आणि काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वाहतूक पोलिसांची राहील, असे आयुक्तांनी या पत्रात नमूद केले आहे.

आयुक्तांच्या या पत्राच्या पार्श्वभूमीवर हा पूल उद्या शनिवारपासून बंद होणार का, असा प्रश्न वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना विचारला त्यांनी हे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. दरम्यान कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यास डोंबिवलीतील नागरिकांना वाहतूककोंडीचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरळीत ठेवून पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करता येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी त्यावर पर्यायी पूल नव्याने बांधल्यास जुना पूल न पाडता हे काम करता येऊ शकते, असा पर्याय सुचविला होता.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पूल बंद करू नये, या मागणीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेऊन काही पर्याय सुचविले होते. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याने सर्वपक्षीय सदस्यांसह विशेषत: शिवसेना-भाजपच्या सत्ताधारी सदस्यांनी रेल्वेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत रेल्वे अधिकाºयांना झोडून काढण्याची भाषा केली होती. या समस्येकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश् म्हात्रे यांनी महासभेत सभा तहकुबीच्या मुद्दा उपस्थित करीत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सर्व सदस्यांनी रेल्वेच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. रेल्वे प्रशासनाकडून चर्चा होऊनही रेल्वेकडून आयुक्तांना ११ सप्टेंबरला नोटीस पाठविण्यात आली होती. कोपर पूल वाहतुकीसाठी बंद करावा, असे त्यात सूचित केले होते. रेल्वेकडून अशा प्रकारची आलेली नोटीस व रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे कायद्याचा आधार घेत महापालिकेस ठणकावले असल्याने आयुक्तांनी जराही दिरंगाई न करता शुक्रवारी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून कोपर रेल्वे पूल तातडीने बंद करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पुलावर आता तोडगा काढण्याऐवजी तो थेट बंद करण्याचा पर्याय सूचविला गेला आहे. त्यामुळे डोंबिवली शहरातील वाहतूककोंडी अटळ आहे, हे या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.

‘महापालिका प्रशासन, सत्ताधारी अपयशी’
मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून महापालिकेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. पुलाची दुरुस्ती महापालिका आणि रेल्वे या दोन्ही सरकारी संस्थांनी केलेली नाही. पुलाच्या वाहतुकीचे नियोजन काय असेल, पुलावरील वाहतूक कोणत्या पर्यायी दिशेने वळविली जाईल, याचा काही उल्लेख व उपाययोजना केलेली नाही. कोपर पुलाच्या बाबतीत सत्ताधारी शिवसेना-भाजप सत्ताधारी युती पूर्णत: अपयशी ठरली आहे.

Web Title: Immediately close the corner rail flyover in Dombivli; Traffic congestion unbreakable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.