नाल्यावर बेकायदा पार्किंग, मीरा-भाईंदरमध्येकोट्यवधी खर्चून बांधलेली गटारे मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:01 AM2019-11-26T00:01:43+5:302019-11-26T00:04:11+5:30

करदात्यांच्या पैशांतून कोट्यवधींचा खर्च करून महापालिकेने बांधलेले सिमेंट - काँक्रिटच्या नाल्यांवर बेकायदा वाहन पार्किंगचा विळखा कायम आहे.

Illegal parking on drain in Mira-Bhayander | नाल्यावर बेकायदा पार्किंग, मीरा-भाईंदरमध्येकोट्यवधी खर्चून बांधलेली गटारे मोडकळीस

नाल्यावर बेकायदा पार्किंग, मीरा-भाईंदरमध्येकोट्यवधी खर्चून बांधलेली गटारे मोडकळीस

Next

मीरा रोड - करदात्यांच्या पैशांतून कोट्यवधींचा खर्च करून महापालिकेने बांधलेले सिमेंट - काँक्रिटच्या नाल्यांवर बेकायदा वाहन पार्किंगचा विळखा कायम आहे. यामुळे कोट्यवधींचे बांधलेले नाले वाहनांच्या भाराने कमकुवत होऊन मोडकळीस आले आहेत. यातून पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होऊन खर्च पाण्यात जाणार आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात लहानमोठे नाले सिमेंट-काँक्रिटचा स्लॅब टाकून ते बंदिस्त केले आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. हे बंदिस्त नाले पादचाऱ्यांसाठी चालण्यास मोकळे ठेवणे अपेक्षित आहे. पण, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांच्या सातत्याने चालवलेल्या दुर्लक्षामुळे या बंदिस्त नाल्यांवर बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण झालेले आहे.

पालिकेच्या बंदिस्त नाल्यांच्या स्लॅबवर सर्रास मोठ्या बस, ट्रक, टेम्पो आदी अवजड वाहनांसह चारचाकी गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या अवजड वाहनांमुळे नाल्यांवरील काँक्रिट स्लॅब आणि ब्लॉक कमकुवत होऊन मोडकळीस आले आहेत. काही ठिकाणी नाल्याचे स्लॅब व त्यावरील काँक्रिटची झाकणे वाकली आहेत, तर काही ठिकाणी तुटली आहेत.

त्यामुळे नाले बांधकामासाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च नाल्यात जात आहे. या वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे नाल्यावरील चेंबरची झाकणेसुद्धा तोडण्यात आली आहेत. परंतु, या गंभीर प्रकरणात आजतागायत महापालिका आणि नगरसेवकांनी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिकाच कायम ठेवली आहे. त्यातच या बेकायदा पार्किंगआड गर्दुल्ले आणि व्यसनींचा गोतावळा वाढला आहे. महिला-मुलींना याचा मनस्ताप होत आहे.

त्यातच, या वाहनांच्या आडोशाला प्रेमीयुगुलांचे चाळे आणि अनैतिक प्रकार चालत असल्याने स्थानिक रहिवासी त्रासले आहेत. बेकायदा वाहन पार्किंगसह नाल्यांच्या स्लॅबवर चक्क गॅरेज थाटली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. सर्वात जास्त या सर्वच प्रकारांकडे स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनीही सातत्याने हात झटकण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत, प्रभाग १२ मधील भाजप नगरसेविका डॉ. प्रीती पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मी याबाबत महापालिकेला सतत तक्रारी केल्या आहेत. कार्यवाही होत नसेल, तर पुन्हा पालिकेकडे पाठपुरावा करेन, असे सांगितले. याचा अर्थ पालिकेत भाजपची सत्ता असूनही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या तक्रारींवर कार्यवाही होत नाही, असे म्हणायचे का? या प्रश्नावर मात्र मी पुन्हा पाठपुरावा करते आणि आठवडाभरात कार्यवाही झाली नाही, तर त्यासंदर्भात बोलते, असे पाटील म्हणाल्या.

वाहनांच्या आडोशाला अनैतिक प्रकार

नाल्यावरच पार्किंग होत असल्याने इतर समस्यांनाही आमंत्रण मिळत आहे. उभ्या राहणाºया या वाहनांच्या आड अनैतिक प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. गर्दुल्ले, व्यसनी आणि प्रेमीयुगुले वाहनांचा आडोसा घेत आहेत. तेथे अश्लील चाळेही सुरू असतात. यामुळे कधीकधी नागरिकांनाही नको ते पाहावे लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांना नाले-गटारांवर बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असे निर्देश देऊ.
- बालाजी खतगावकर, आयुक्त, मीरा-भाईंदर

अवजड आणि वाणिज्य तसेच खाजगी वापरातील वाहनांकडून महापालिकेच्या नाल्यांवर बेकायदा पार्किंगसाठी हप्तेखोरी चालत असल्याशिवाय हे शक्य नाही. करोडो रुपये ज्या नाल्यांसाठी खर्च केले ते वाहनांच्या पार्किंगमुळे लवकर कमकुवत झाल्यावर पालिका आणि नगरसेवक पुन्हा करोडो रुपये खर्च करण्यासाठी मोकळे. या प्रकरणात पालिका अधिकारी आणि नगरसेवकांचे संगनमत असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- अ‍ॅड. सुशांत पाटील, नागरिक

Web Title: Illegal parking on drain in Mira-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.