हेडलाइन हवी असेल तर शरद पवारांचे नाव घेतले जाते, सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:31 IST2023-11-28T13:29:50+5:302023-11-28T13:31:25+5:30
Supriya Sule: अंतरवाली सराटीतील दगडफेकीतील आरोपीसोबत एकट्या शरद पवार यांचे नव्हे तर राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये एक नंबरचे नेते आहेत. जेव्हा हेडलाइन हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते.

हेडलाइन हवी असेल तर शरद पवारांचे नाव घेतले जाते, सुप्रिया सुळेंची टीका
ठाणे - अंतरवाली सराटीतील दगडफेकीतील आरोपीसोबत एकट्या शरद पवार यांचे नव्हे तर राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये एक नंबरचे नेते आहेत. जेव्हा हेडलाइन हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद, प्रेमामुळे गेले सहा दशके हे नाव टिकून आहे, अशा उपरोधिक शैलीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी भगवती मैदान ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यानापर्यंत दिंडीचे आयोजन केले होते.
महात्मा जोतिबा फुले स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. या दिंडीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. सत्यशोधक विचार संवर्धन समिती-ठाणे या समितीच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना सुळे म्हणाल्या की, ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेली अनेक वर्षे झाले त्या सत्यशोधक समाजाच्या विचारांतून आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला दिशा दिली. हाच पुरोगामी विचार अनेक दशके आमच्या कुटुंबात आहे. त्या विचारांचा उजाळा नवीन पिढीला देण्याकरिता प्रज्ञा पवार प्रयत्न करीत आहेत, असे सुळे म्हणाल्या.
तातडीने केंद्र सरकारशी संपर्क करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीने केंद्रातून टीम यायची, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.