करवसुलीचे लक्ष्य हुकल्याने 70 टक्केच मिळणार पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:16 IST2021-04-04T01:15:57+5:302021-04-04T01:16:06+5:30
उल्हासनगर पालिका : आयुक्तांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

करवसुलीचे लक्ष्य हुकल्याने 70 टक्केच मिळणार पगार
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची वसुली केली असा ठपका ठेवत आयुक्तांनी वसुलीच्याप्रमाणात ७० टक्के पगार काढण्याचे आदेश विभागप्रमुख उपायुक्त मदन सोंडे यांना दिले आहेत. याप्रकाराने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाल्याने पगार नको अशी भूमिका घेतली आहे.
कोरोना काळात मालमत्ता कर बिले सहा महिने उशिराने गेल्याने ऑक्टोबर महिन्यानंतर खऱ्या अर्थाने विभागाची वसुली सुरू झाली. दरम्यान विभागाच्या कर निर्धारक संकलकपदी जेठानंद करमचंदानी यांची नियुक्ती केली. तर विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार सोंडे यांच्याकडे देण्यात आला. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळ असल्याने नागरिकांना सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत ७१ कोटींची वसुली केली. गेल्यावर्षी विभागाची ७७ कोटींची वसुली झाली होती. कोरोना काळातही गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याबद्दल विभागाचे कौतुक होत आहे.
आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मात्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण केले नाही असा ठपका ठेवला. सुट्टीवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी सोंडे यांना मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुलीच्या प्रमाणात ७० टक्के काढण्याचे तोंडी आदेश दिले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशनव्हे सोंडे यांनी करमचंदानी यांना विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ७० टक्के प्रमाणात वेतन बिल लेखा विभागाला पाठविण्यास सांगितले. याप्रकाराने विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
कोरोना काळात घरोघरी जाऊन कोणतीही सक्ती न कारण अवघ्या काही महिन्यात ७१ कोटींची वसुली करूनही ७० टक्के पगार देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला पगार नको, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत पगाराचे बिल पाठवू नका, अशी विनंती केल्याची माहिती करमचंदानी यांनी दिली.
दरम्यान, याआधीही ज्या कर्मचाऱ्यांनी वसुली कमी केली होती त्यांचे पगार रोखण्याचे आदेश संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. दरवेळेस आम्हालाच का जबाबदार धरले जाते असा सवाल विचारला जात आहेत.
अन्य विभागाकडून अपेक्षित वसुली केली जात नसताना त्यांना जबाबदार धरले जात नाहीत, केवळ आम्हीच दिसतो का असेही कर्मचारी विचारत आहेत. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला असून आम्ही जीव धोक्यात घालून वसुली करुनही आमच्यावर अन्याय होणार असेल कर आम्ही काम तरी का करायचे, प्रशासनाने आपली ही भूमिका तातडीने बदलण्याची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
कर्मचारी संघटना आक्रमक
महापालिका मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी आयुतांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. सोमवारी आयुक्त सुट्टीवरून परत आल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतरही त्यांनी भूमिका बदलली नाहीतर, संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.