लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणे अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळे लढण्याची मुभा दिली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी केले. ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत युती करायची किंवा नाही, याबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही नाईक म्हणाले.
नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात तिसरा जनता दरबार भरवला. त्यावेळी महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत महायुतीत निवडणूक लढवण्यास विरोध दर्शवला. नवी मुंबई, उल्हासनगर, भाईंदरमध्ये भाजप एक क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा परिषद भाजपची आहे. तेथील आमदार मित्रपक्षाचे आहेत; पण खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे त्याठिकाणी प्राबल्य भाजपचे आहे. शिंदेसेनेने, अजित पवार गटाने प्रयत्न केले पाहिजेत. महायुतीत लढावे, असे सर्वांचे म्हणणे आहे. परंतु, काही बाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे नाईक म्हणाले.
यापूर्वी २०१५ पर्यंत बांधलेल्या बांधकामांना अभय दिले गेले. भविष्यात अनधिकृत बांधकाम सुरुवातीलाच तोडण्यात येतील, असेही ते म्हणाले.
सगळीकडे महापौर बसविण्याचा प्रयत्न
सगळीकडे महापौर बसविण्याचा आमचा प्रयत्न असेल, लोक आम्हाला स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. ज्याठिकाणी महायुतीचे प्राबल्य असेल त्याठिकाणी महायुतीचा महापौर असेल, ज्याठिकाणी भाजपचे प्राबल्य असेल त्याठिकाणी आम्ही स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरणार, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
सर्वच ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था
वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले असता नाईक म्हणाले की, राज्यात सर्वच ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पूर्वी कमी वजनाच्या गाड्या होत्या, परंतु आता १०० टन वजनाच्या गाड्या निघाल्या. त्यामुळे रस्ते इतका भार वाहून नेण्यासाठी सक्षम राहिलेले नाही. नवीन रस्ते तयार होत असून, या समस्येवर मात केली जाईल. मुंबईमधील इमारती जेव्हा बांधून पूर्ण होतील, तेव्हा जमिनीखालून रस्ता, वरून (एलिव्हेटेड) रस्ता बांधावे लागणार आहेत.
ठाण्यात शिंदेसेनेचाच भगवा फडकणार. तोदेखील महायुतीचा म्हणून. त्यांना आता काय बोलायचे ते बोलू द्या.- संजय शिरसाट, मंत्री, शिंदेसेना