"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:37 IST2025-12-11T11:36:47+5:302025-12-11T11:37:27+5:30
२००८ साली कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतातील युवकांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला

"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जुन्या खटल्यानिमित्त ठाणे कोर्टात हजर झाले होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले. मात्र काही मिनिटांत ही सुनावणी संपली. या सुनावणीवेळी राज ठाकरे यांनी मला गुन्हा मान्य नाही असं एका वाक्यात कोर्टात उत्तर दिले. त्यानंतर सुनावणीनंतर राज ठाकरे कोर्टाबाहेर निघत घराच्या दिशेन मार्गस्थ झाले.
आजच्या सुनावणी काय घडलं?
कल्याण रेल्वे भरती प्रकरणातील घटनेबाबत २०१९ मध्ये कल्याण कोर्टातून ठाणे सत्र न्यायालयात हा खटला आला. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकदाही या खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे गेल्या सुनावणीत कोर्टाने राज ठाकरेंना समन्स बजावून त्यांच्या अटकेचेही आदेश दिले होते. अटकेची कारवाई मनसेच्या वकिलांनी सुनावणीवेळी टाळली होती. पुढच्या सुनावणीला राज ठाकरे उपस्थित राहतील असं सांगितले होते. त्यानंतर आज राज ठाकरे इतर ७ आरोपींसह कोर्टात हजर राहिले. आजच्या सुनावणीत न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना तुम्हाला गुन्हा मान्य आहे का असं विचारले तेव्हा मला हा गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर सांगितले.
तसेच आजच्या सुनावणीत कोर्टाने या प्रकरणातील कोण कोण आरोपी हजर आहेत अशी विचारणा केली. त्यात सर्व आरोपी हजर होते. त्यानंतर न्यायाधीशांनी एका महिन्यात हे प्रकरण निकाली लावू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे पुढील महिनाभरात पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होईल आणि हा खटला संपवला जाईल अशी शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
२००८ साली कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतातील युवकांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यात रेल्वेने राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे ही घटना घडली त्यामुळे त्यांनाही आरोपी करण्यात यावे असं म्हटलं होते. त्यानंतर कोर्टाने इतर आरोपींसह राज ठाकरे यांनाही आरोपी बनवले. सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी कल्याण कोर्टात होती. त्यानंतर हा खटला ठाणे सत्र न्यायालयात हलवण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीत राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीत राज ठाकरे स्वत: कोर्टासमोर हजर झाले.