I can give injections to anyone without a doctor; Chief Minister Thackeray's warning to the opposition | डॉक्टर नसलाे तरी मी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो; मुख्यमंत्री ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

डॉक्टर नसलाे तरी मी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो; मुख्यमंत्री ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

कल्याण : मी डॉक्टर नसलो, तरी कुणालाही इंजेक्शन देऊ शकतो, असे सांगून डॉक्टर नसले तरी इंजेक्शन देता आले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना रविवारी हसतहसत दिला. माझ्या म्हणण्याचा शब्दश: अर्थ काढून तुम्ही कुणालाही इंजेक्शन देऊ नका, असे मुख्यमंत्री डॉक्टरांना उद्देशून मिश्कीलपणे म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीत कल्याण-डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला. जनतेची कामे करण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही, असा चिमटा कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी काढला. भिवंडी ग्रामीण भागात कोविड रुग्णालये नव्हती. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले.

हद्दीचा मुद्दा आड न येता भिवंडीतील कोविड रुग्णांवर कल्याणच्या रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केल्याचे सांगून पाटील यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्नही केला. पाटील यांनी काढलेल्या चिमट्याला खासदार शिंदे यांनी उत्तर दिले. कोविड रुग्णालय हे पाटील यांच्या मतदारसंघात झाले आहे. मी काम करीत असताना भेदभाव करीत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, श्रीकांत शिंदे डॉक्टर असल्याने त्यांना आरोग्यासंदर्भातील गोष्टी कळतात. मान्यवरांच्या भाषणातून डाॅक्टरबाजी सुरु असताना, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भात्यातून इंजेक्शन काढत सगळ्यांनाच चूप केले.

Web Title: I can give injections to anyone without a doctor; Chief Minister Thackeray's warning to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.