बिबट्याचा वृद्धेवर हल्ला; पत्नीला वाचवण्यासाठी ७२ वर्षांचा पती बिबट्याला भिडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:02 IST2022-03-20T13:00:58+5:302022-03-20T13:02:26+5:30
हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

बिबट्याचा वृद्धेवर हल्ला; पत्नीला वाचवण्यासाठी ७२ वर्षांचा पती बिबट्याला भिडला
खोडाळा/मोखाडा : शुक्रवारी रात्री दहा वाजता वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी ७२ वर्षीय पती काशिनाथ सापटे यांनी प्रतिकार करून आपल्या पत्नीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. दरम्यान, या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे (वय ७२) व त्यांची पत्नी पार्वती सापटे (वय ६५) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. यामुळे पार्वती बघायला उठल्या आणि अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केल्य़ानंतर पतीने बाहेर जाऊन आपल्या पत्नीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली, मात्र तरीही बिबट्या पळून न जाता त्याने तिथेच बस्तान मारले. हे पाहून या पती-पत्नीने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेऊन बिबट्याला पिटाळून लावले. परंतु, काही वेळातच बिबट्या परत गावाकडे येताना ग्रामस्थांना दिसला. मग, ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाचारण केले असता वनविभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी व इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या ठिकाणी बिबट्याच्या दहशतीच्या घटना ताज्या असताना आता बिबट्याचा मोर्चा मोखाडा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर वळला आहे. या घटनेचे वृत्त समजताच पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सापटे कुटुंबाने दाखवलेल्या धैर्याचे निकम यांनी कौतुक केले.
ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
बिबट्याच्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या आपली शिकार करण्यासाठी मानव वस्तीकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी बेफिकीर न राहता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.