ठाणे जिल्ह्यातील शेकडो एकर भात पिकांवर बगळ्या, करप्या, खोडकीडा रोगांचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:13 IST2025-09-18T18:12:46+5:302025-09-18T18:13:13+5:30
शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेकडो एकर भात पिकांवर बगळ्या, करप्या, खोडकीडा रोगांचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत!
सुरेश लोखंडे -
ठाणे : जिल्ह्यात प्रथमपासून पावससाचा जाेर कायम आहे. त्यात उन्हाचा अभाव असून खरीपाचे भात पीकही डाेलत आहे. मात्र सध्याच्या या जादा पावसामुळे कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांत यंदाच्या खरीप हंगामात शेकडो एकर भात पिकांवर बगळ्या, करप्या आणि खोडकीडा या रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेषतः शहापूरच्या किन्हवली परिसरातील शेतकरी या रोगांमुळे चिंतेत आहेत कारण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रादुर्भावास अनुसरून पहाणी सुरू असल्याचे कृषी विभागाकडून ऐकवले जात आहे.
शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका वाढल्याने शेतकरी हताश आहेत. शहापूरमधील प्रकाश भागरथ, विहिगावच्या प्रगतिशील शेतकरी साकारु वाघ यांसह अनेकांनी त्यांच्या पिकांवर रोगांचा गंभीर प्रादुर्भाव असल्याचे सांगितले आहे.
याचबरोबर मुरबाड तालुक्याच्या न्हावे-सासणे परिसरात करप्या आणि खोडकीडा रोगाने देखील पिकांचे नुकसान सुरू आहे. रमेश यशवंत हिंदुराव व काशिनाय तुकाराम हिंदुराव यांच्यासह उमेश केदार यांनी या रोगांचे शेतातील भात पिकांवर प्रादुर्भाव असून शेतकरी काळजीत असल्याची माहिती दिली आहे. तसेच विनायक ठाकरे (म्हाडास), रमाकांत केदार, शांताराम भोईर, भास्कर बांगर, काशिनाथ घागस, शंकर भोईर आणि चंद्रकांत केदार यांच्या शेतांतही या रोगांचे उच्च प्रमाणात आढळले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सतत चालणाऱ्या पावसामुळे आणि अनियमित हवामानामुळे बगळ्या तसेच करप्या, खोडकीडा रोगांसाठी वातावरण पोषक झाले आहे ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढेल. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाच्या अनियमित लहरीपणामुळे आधीच मोठे नुकसान सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे रोग आणखी एक मोठे संकट बनले असून, शेतकरी संघटनाही या समस्येकडे लक्ष देत शासनास गंभीरपणे हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहेत. कृषी विभागाने बगळ्या, करप्या आणि खोडकीडा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरीत औषधोपचार, तांत्रिक मदत व तज्ञांचे मार्गदर्शन सुरू करावे, अन्यथा उत्पादनात मोठा घसरण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात क्राॅप सॅप म्हणजे भात पिकावरील कीड राेग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प या याेजनेअंतर्गत सतत पाहाणी व सर्वेक्षण सुरू आहे. कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञांनीही शहापूर तालुक्यास या आधी भेट देऊन पहाणी करून उपाययाेजना सुवलेल्या आहेत.
- विशाल माने - डीएसएओ, कृषी विभाग, ठाणे