भिवंडीत खुल्या मैदानात थाटलेल्या मॅरेज हॉलला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 23:48 IST2021-11-28T23:47:54+5:302021-11-28T23:48:51+5:30
Bhiwandi : या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली.

भिवंडीत खुल्या मैदानात थाटलेल्या मॅरेज हॉलला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळून खाक
- नितिन पंडीत
भिवंडी : शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.
या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.