ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:18 IST2025-05-06T07:18:04+5:302025-05-06T07:18:22+5:30
सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोणी मोबाइलवरून, तर कोणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के लागला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल ९५.०६ टक्के, तर मुलांचा निकाल ९२.४७ टक्के इतका लागला. गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.८ टक्के इतका लागला होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या निकालात ०.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. कोणी मोबाइलवरून, तर कोणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
जिल्ह्यात एकूण ९६ हजार ०८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधील ८९ हजार ८२७ उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ४९ हजार ००१ इतक्या मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ हजार १७० मुले उत्तीर्ण झाली. ४७ हजार ०८८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ४४ हजार ६५७ उत्तीर्ण झाल्या.
६ ते २० मे दरम्यान अर्ज
बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वत: किंवा कनिष्ठ काॅलेजतर्फे अर्ज करण्याची सुविधा आहे. ६ ते २० मे या कालावधीत हे अर्ज करता येतील.
पाच वर्षांतील निकालाची जिल्ह्याची आकडेवारी
२०२० ८९.८६%
२०२१ ९९.८७%
२०२२ ९२.६७%
२०२३ ८८.९०%
२०२४ ९२.०८%
२०२५ ९३.७४%