लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 16:47 IST2021-04-19T16:13:23+5:302021-04-19T16:47:10+5:30
कोरोना आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नव्हती का? जीआरपी, आरपीएफ पोलीस होते कुठे?

लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी?
डोंबिवली : वांगणी रेल्वे स्थानकात अंध माता मुलासह गेली, आणि तेवढ्यात होणारा अपघात अनर्थ सुदैवाने आणि मयूर शेळके या पाँईंटमनच्या धाडसी कामगिरीने टळला. परंतु कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाचे निर्बंध असताना ते मायलेक स्थानकात गेले कसे काय? पोलीस यंत्रणा काय करत होती? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केला आहे.
मयूर शेळके हा पॉइंट्समन जर तेथे नसता, प्रसंगावधान राखून त्याने त्या बालकाचा जीव वाचवला नसता तर होत्याचे नव्हते झाले असते याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असा सवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वांगणीचे रहिवासी मनोहर शेलार यांनी केला आहे. शेळके यांचे कौतुक करायला हवेच, महासंघ, वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने ते केलेच. परंतु, दुसऱ्या मुद्याकडे लक्ष द्यायला हवे, की ते आत फलाटमध्ये आलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का? आरपीएफ, जीआरपी पोलीस यंत्रणा काय करत होती? कार्यरत होती की नव्हती? असेल तर कोण होते, त्यावेळी ते फलाटात काय करत होते याची चौकशी, कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत शेलार यांनी व्यक्त केले.
दरम्यान रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात शेळके यांच्यासारखे सतर्क कामगार असतीलच असे नाही, त्यामुळे धोरणात्मक कार्यपद्धतीनुसार या अपघाताचा केवळ सत्कार करण्यापर्यन्त आनंद व्यक्त न करता, हे नेमके घडलेच कसे यांच्या मुळापर्यत जायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले.