झोपड्यांना लोकप्रतिनिधींचे अभय
By Admin | Updated: August 18, 2015 00:29 IST2015-08-18T00:29:19+5:302015-08-18T00:29:19+5:30
कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६० चा बहुतांश भाग हा डोंगराळ असून या डोंगरावर वन खाते, मनपा आणि तथाकथित पुढारी, झोपडपट्टीदादा यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या २० वर्षांत

झोपड्यांना लोकप्रतिनिधींचे अभय
दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६० चा बहुतांश भाग हा डोंगराळ असून या डोंगरावर वन खाते, मनपा आणि तथाकथित पुढारी, झोपडपट्टीदादा यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या २० वर्षांत असंख्य झोपड्या बेकायदेशीररीत्या तत्कालीन नगरसेवक रमेश जाधव, जयश्री कुळकर्णी, राजेंद्र पाटील व प्रतिमा जाधव यांच्या साक्षीने बांधण्यात आल्या आहेत. अधूनमधून त्यावर लुटुपुटुच्या कारवाया झाल्या. परंतु, या वाढत्या झोपड्यांना आळा बसलेला नाही.
एकेकाळी निसर्गसौंदर्याने नटलेली ही टेकडी भूमाफियांच्या झोपडपट्टीमुळे बकाल झाली आहे. मनपातर्फे झोपडपट्टीवासीयांच्या नागरी सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, सध्याची भागाभागांतील दुरवस्था पाहिल्यानंतर तो संपूर्ण निधी नियोजनशून्य कारभारामुळे वाया गेला असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
भूमाफियांनी झोपड्या बांधताना डोंगर पोखरले, त्यामुळे दरडी मोकळ्या झाल्या. त्याच दरडी कोसळून गेल्या काही वर्षांत अनेक दुर्घटना झाल्या. पावसाळा आला की, येथील लोक जीव मुठीत धरून राहतात. महापालिकेच्या वतीने दरडग्रस्त भागातील लोकांना घरे खाली करण्याच्या पावसाळ्यात नोटिसा दिल्या जातात, पण लोक खाली करीत नाहीत, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.
सिद्धार्थनगर, गणेशनगर, अजंठानगर, शिवशक्तीनगर, रामनगर, भीमनगर, आंबेडकरनगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर येथील वसाहतींमध्ये सर्व जातीधर्मांचे लोक नाइलाजास्तव अतिशय गलिच्छ वातावरणात राहत आहेत.
मनपाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टेकडीवर बांधलेल्या जलकुंभातून डोंबिवलीला पाणी पुरवले जाते, पण टेकडीवासीयांना मात्र पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे जमिनीत खोलवर असलेल्या पण जीर्ण झालेल्या गणेशनगर, आनंदनगरमधील जलवाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकल्या आहेत. बौद्धविहार टेकडी भागात पाणी चढविण्याकरिता संपपंप लावून पाणी पोहोचविण्यात आले आहे. परंतु, असंख्य ठिकाणी जोडण्यांमधून गळती आहे. जलवाहिन्या गटारांतून गेल्या आहेत. दूषित पाणी पिण्यामुळे रोगराई वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
घरदुरुस्ती करताना ज्यांच्या जागाजमिनी आहेत, त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे महिलांनी दु:ख मांडले. बहुतांशी झोपड्यांमध्ये संडास नाहीत, त्यांना निर्मल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचाच आधार आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेने त्यांची अपुरी संख्या, त्यामुळे प्रचंड ताण पडतो. मात्र, शौचालयांच्या स्वच्छतेवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्या वाहत्या घाणीच्या नरकातच लोक राहतात. आनंदनगर, जयभवानीनगर व साईकृपा हॉटेलमागील परिसरात ही परिस्थिती आढळली.
आनंदनगर, जयभवानीनगर, साईकृपा हॉटेल, देवीकृपा हॉटेलमागील परिसरात जुनी गटारे दुरुस्त करून नव्याने बांधण्यात आली आहेत. परंतु, चाळीचाळींमधील अंतर्गत गटारांची अवस्था अतिशय भयानक आहे. महात्मा फुलेनगर, गणेशनगर, अजंठानगर भागातील दुरवस्थेतील लाद्या काढून नवीन बसविल्या आहेत.
सूचकनाका, रामनगर, सम्यक विद्यालय या मार्गावर ७ लक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ असलेल्या भागापासून कायम पाणी वाहत असते. अनेक ठिकाणी लिकेज असण्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे रस्त्याची अवस्था इतकी खडकाळ व खड्डेमय आहे की, दोन वेळा रस्त्यांचे डांबरीकरण करूनही वाया गेले आहे. भूमिगत जलवाहिन्यांचे लिकेज काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही मनपाने लक्ष न दिल्याचे नगरसेविका प्रतिमा जाधव यांनी सांगितले.
या प्रभागात आरक्षण क्र. ४९२ वर प्राथमिक शाळेचा विस्तार, तर आरक्षण क्र. ५०६ वर बगिच्याचे उद्दिष्ट आहे, परंतु मनपाने या जागा ताब्यात न घेतल्याने प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.