भाईंदर: माणुसकीला काळिमा फासणारी आणि सरकारी रुग्णालयांच्या अनागोंदी कारभाराचे धिंडवडे काढणारी एक संतापजनक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा उंदराने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
सौ. सुहासिनी दामोदर माठेकर (वय ८९) या गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी आहेत. त्यांना १२ मार्च रोजी भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चौथ्या मजल्यावरील आयसीयू वॉर्डात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र, आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास एका उंदराने त्यांच्या हाताचा चावा घेतला. व्हेंटिलेटरवर असल्याने त्या हलू शकत नव्हत्या, अशा स्थितीत हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राजकीय पदाधिकाऱ्याची आईच ठरली शिकार
मिळालेल्या माहितीनुसार, सुहासिनी माठेकर या 'प्लेजंट पार्क' येथील रहिवासी असून त्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या पदाधिकारी सौ. मीनल यांच्या सासूबाई आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर असताना हा प्रकार घडला. स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या रुग्णासोबत असा प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
हॉस्पिटल प्रशासनाचा अडेलतट्टू पवित्रा
या घटनेनंतर सुहासिनी माठेकर यांचे नातेवाईक प्रचंड संतापले आहेत. आपल्या हतबल रुग्णाला या परिस्थितीत येथे ठेवणे सुरक्षित नसल्याचे सांगत नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाला हलवण्यास नकार दिला.
सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. मात्र, अतिदक्षता विभागात जिथे अत्यंत निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता आवश्यक असते, तिथे उंदरांचा वावर असणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे. या घटनेनंतर आता रुग्णालय अधीक्षक जफर तडवी यांनी सखोल चौकशी करून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिले आहे.
Web Summary : A shocking incident occurred in Bhayandar where a rat bit an 89-year-old woman on a ventilator in a government hospital ICU. Relatives are outraged, demanding action and a hospital transfer due to unsafe conditions. Hospital authorities have promised a thorough investigation.
Web Summary : भायंदर के एक सरकारी अस्पताल के आईसीयू में वेंटिलेटर पर एक 89 वर्षीय महिला को चूहे ने काटा। परिजनों में आक्रोश है, कार्रवाई और अस्पताल में असुरक्षित स्थितियों के कारण स्थानांतरण की मांग कर रहे हैं। अस्पताल प्रशासन ने गहन जांच का वादा किया है।