हनी ट्रॅपद्वारे लग्नाचे आमिष; फसवणूक करणाऱ्यास ठोकल्या बेड्या, लखनौच्या कॉल सेंटरवर ठाणे पोलिसांची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:38 IST2025-01-21T10:37:34+5:302025-01-21T10:38:47+5:30
Thane Crime News: हनी ट्रॅपद्वारे फसवणूक करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जैद खान (२४) आणि यातील सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (३२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली.

हनी ट्रॅपद्वारे लग्नाचे आमिष; फसवणूक करणाऱ्यास ठोकल्या बेड्या, लखनौच्या कॉल सेंटरवर ठाणे पोलिसांची धडक
ठाणे - हनी ट्रॅपद्वारे फसवणूक करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जैद खान (२४) आणि यातील सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (३२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामधील एजाज याला कारमधून पळून जात असताना पाठलाग करून पकडले. लखनौच्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.
जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर बनावट आयडी बनवून मुंब्रा भागातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत भामट्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्या बँक खात्यातून १३ लाख ५४ हजार ९८१ रुपये ऑनलाइन घेतले. तिच्याशी लग्न न करताच तिची फसवणूकही केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात १० ऑक्टोबर २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने जीवनसाथी या वेबसाइटवरून ई- मेल आयडी, तक्रारदार तरुणीची माहिती मिळविली. त्याआधारे ९ जानेवारी रोजी जैदला भोपाळमध्ये शोध घेऊन अटक केली.
पाच किलोमीटरपर्यंत केला पाठलाग
जैदच्या चौकशीत सूत्रधाराच्या मोबाइलसह इतर माहिती मिळाली. त्याच्या लोकेशनच्या आधारे लखनौमध्ये एका कॉल सेंटरवर पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावला. पोलिसांच्या सापळ्याची चाहूल एजाजला लागल्यानंतर त्याने एका वाहनातून पळ काढला. त्यावेळी सुरवाडे यांच्या पथकाने त्याला पाच किलोमीटर अंतर कारने पाठलाग करून पकडले.
सावजासाठी कॉलसेंटरचा वापर
या भामट्यांनी अडीच हजार चौरस फुटांचे कॉलसेंटर थाटले हाेते. कॉलसेंटरमधील मुले-मुली प्रसंगी अश्लील व्हिडीओ दाखवून सावज हेरत होती. त्यानंतर गिफ्ट पाठविल्याचे सांगून त्याच गिफ्टसाठी कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेत होते. काहींना अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवूनही पैसे घेतले जात होते.