महामार्गांवरील कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:20 AM2019-09-20T00:20:37+5:302019-09-20T00:20:42+5:30

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.

Heavy vehicles will be placed on the weighting line to prevent dirt on the highways | महामार्गांवरील कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटिंगवर

महामार्गांवरील कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटिंगवर

Next

ठाणे : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यातील खड्डे भरण्याची तंबी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिली. याशिवाय, महामार्गांवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ती काही वेळेनंतर टप्प्याटप्प्याने सोडण्याचे आदेशही त्यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले.
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी शिंदे यांनी रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी खड्डे न भरल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करावी लागणार आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने सोडायची. यामुळे घोडबंदर रोडसह अन्य रस्त्यांवर या वाहनांमुळे वाहतूककोंडी होणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पालघरकडून घोडबंदर, अहमदाबाद महामार्गाने येणाºया अजवड वाहनांना रोखण्यासाठी व नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांना रोखण्यासाठी मोठ्या भूखंडांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या भूखंडांवर ही अवजड वाहने थांबवण्यात यावी. त्यानंतर, ती टप्प्याटप्प्याने महामार्गांवर सोडावी, असे निर्देश शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले. यासाठी पडघ्याजवळ किंवा शहापूर, मुरबाड परिसरात भूखंड शोधण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जेएनपीटी, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन आदी यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूककोंडीवर एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
याबरोबरच वाहतूककोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसंदर्भात वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. या बैठकीस पालघर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार संजय केळकर, शांताराम मोरे, बाळाराम पाटील, बालाजी किणीकर, सुभाष भोईर, ज्योती कलानी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरामध्ये येणाºया आणि बाहेर जाणाºया रस्त्यांवर होणाºया वाहतूककोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाºया उपाययोजनांचा यावेळी शिंदे आणि चव्हाण यांनी आढावा घेत यंत्रणांना धारेवर धरले. ठाणे वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी जेएनपीटीमध्ये असलेल्या वाहनतळाचा तत्काळ वापर सुरू करण्यात यावा, रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. सिडकोकडे असलेली वाहनतळे तत्काळ हस्तांतरित करण्यात यावीत. पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी पालघरमधील दापचेरी, मनोर, चारोटीनाका येथील जागांची उपलब्धता वाहनतळांसाठी करून द्यावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. ठाणे ग्रामीण भागातील शहापूर, पडघ्याचा वापर करावा. या वाहनतळाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन, फलक तसेच बॅरिकेड्स लावण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत चव्हाण यांनी खड्ड्यांबाबत अधिकाºयांना फैलावर घेतले. ठाणे जिल्ह्यासह पालघर व रायगड जिल्ह्यांत पावसामुळे पडलेले खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही फटका बसत असून, रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी पालिका क्षेत्रातील खड्ड्यांची माहिती या वेळी दिली.
।पथकर मार्गावरील खड्डे प्राधान्याने भरण्याबाबत संबंधित संस्थांना चव्हाण यांनी आदेश दिले. खड्डे तत्काळ न भरल्यास पथकर बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शीळफाटा, कळंबोलीनाका, पनवेल-उरण रस्ता, मुंब्रा बायपास आदी ठिकाणी होणाºया वाहतूककोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कोपरी पूल, पत्रीपूल कामाच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. या पुलांच्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या. यावेळी वाहतूककोंडीवरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. अवजड वाहनांना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.

Web Title: Heavy vehicles will be placed on the weighting line to prevent dirt on the highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.