ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:58 IST2025-09-20T12:58:17+5:302025-09-20T12:58:53+5:30
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्या ऐवजी सरसकट अवजड वाहनांना बंदी केल्याने त्याचा प्रचंड ताण घोडबंदर मार्ग व मुंबई - अहमदाबाद महामार्गावर येऊन नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे.

ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्या ऐवजी सरसकट अवजड वाहनांना बंदी केल्याने त्याचा प्रचंड ताण घोडबंदर मार्ग व मुंबई - अहमदाबाद महामार्गावर येऊन नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांनी ह्या पूर्ण अवजड वाहन बंदी बाबत नाराजी व्यक्त करत परखड भूमिका घेतल्या नंतर आता ठाणे पोलीस आयुक्तालयाने अवजड वाहन बंदीच्या वेळेत बदल केला आहे. शिवाय ठाण्याच्या बंदी नुसार मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने देखील अवजड वाहनांच्या बंदी बाबत अधिसूचना जारी केली आहे.
घोडबंदर मार्गावरून मुख्यत्वे परिसरातील अनेक औद्योगिक वसाहती, जेएनपीटी बंदर आदी ठिकाणी माल - इंधन वाहू अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. ठाण्यातील वाहतूक कोंडी वरून राजकारण तापले आहे. त्यातूनच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शहरात चक्क सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली.
ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गवरील गायमुख येथे अवजड वाहने अडवून ठेवल्याने घोडबंदर मार्ग पासून मुंबई - अहमदाबाद महामार्ग देखील जाम झाला. तब्बल १५ किमी अंतराचा जाम लागला. त्यात अवजडच नव्हे तर लहान व प्रवासी बस आदी वाहने देखील अडकून पडली. लोकांचे अतोनात हाल झाले. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी याची गंभीर दखल घेत अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद बद्दल ठाणे पोलिसां कडे नाराजी व्यक्त केली. कारण इतक्या मोठ्या संख्येने मालवाहू वाहने असताना तब्बल १८ तास प्रवेश बंद करणे नवीन अडचणी निर्माण करणारे ठरले. त्या नंतर ठाणे पोलिसांनी वेळेत बदल करत आता सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ३ ते रात्री ११ ह्या वेळेत अवजड वाहनांना २ ऑक्टोबर पर्यंत बंदी जारी केली आहे.
ठाणे पोलिसांच्या अवजड वाहन बंदी नुसार आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने देखील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात बाजूकडून ठाणे, भिवंडी शहर, कल्याण शहर दिशेकडे जाणा-या तसेच मुंबई व मिराभाईंदर शहरातून ठाणे बाजूस जाणा-या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना प्रवेश बंदी मनाई बाबत अधिसूचना जारी केली आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पार्किंग करण्यास मनाई केली आहे.
२० सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत ही अवजड वाहन बंदी सकाळी ६ ते १० पर्यंत व सायंकाळी ५ पासून ते रात्रौ १० वाजे पर्यंत असणार आहे.
प्रवेश बंद- १) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- गुजरात बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना खानिवडे टोल प्लाजा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्रवेश बंद- २) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- विरार बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्रवेश बंद - ३) राष्ट्रीय महामार्ग क्र ४८- पालघर- वसई बाजूकडून येणा-या सर्व अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
प्रवेश बंद- ४) पश्चिम दृतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्या-या सर्व अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.